पुणे : घरोघरी तयार होणारा कचरा इमारतींच्या खाली तसेच सोसायट्यांच्या प्रवेशद्वाराजवळ गोळा करण्याचा विमाननगर आणि भवानी पेठेत महापालिकेने केलेला प्रयोग इतर भागांतही करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. महापालिकेचे घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी ही माहिती दिली. जे नागरिक कचरा गोळा करण्याचे शुल्क देत नाहीत, त्यांचा कचरा गोळा केला जात नव्हता. परिणामी, अनेक नागरिकांकडून रात्री किंवा पहाटे रस्त्यांच्या कडेला सर्रास कचरा टाकण्याचे प्रकार होत असत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी जाऊन कचरा संकलन करणारे सेवक आणि कचरा वाहून नेण्याची व्यवस्था याची सांगड घालून सार्वजनिक ठिकाणी कचरा दिसणार नाही यासाठी एक प्रयोग राबविण्यात आला होता.

विमाननगर तसेच भवानी पेठ येथे हा प्रयोग गेल्या महिनाभरापासून केला जात आहे. याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे रस्त्याच्या कडेला तसेच पदपथांवर पडणारा कचरा बंद झाला आहे. हा प्रयोग आता शहरातील इतर भागांमध्ये करण्याचा विचार घनकचरा विभागाने सुरू केला आहे.यापूर्वी या भागात कचरा वेचकांमार्फत गोळा केला जाणारा कचरा फीडर पॉइंटवर आणून दिला जात होता. तेथे कचऱ्याचे अंतिम विलगीकरण केले जात होते. ही प्रक्रिया अगदी दुपारपर्यंत सुरू असल्याने फीडर पॉइंटवर कचऱ्याचे ढीग दिसत होते. हे पॉइंट रस्त्याच्या कडेलाच असल्याने परिसर अस्वच्छ दिसत असे. या पॉइंटचे उच्चाटन करण्यासाठी कचरा वेचकांमार्फत गोळा केला जाणारा कचरा आणि त्याच वेळी वाहून नेण्यासाठी वाहनांचे वेळापत्रक तयार करण्यात आले. यासाठी वाहनांचे जीपीएस ट्रॅकिंगही करण्यात आले.

‘गेले तीस दिवस भवानी पेठ, विमाननगर भागात याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामध्ये ही पद्धत यशस्वी ठरली. त्यामुळे या दोन भागातील फिडर पॉइंट्सचे उच्चाटन होउन हा परिसर स्वच्छ दिसू लागला आहे. कचरा वेचक आणि वाहन चालकांमध्ये जबाबदारीची जाणीवही निर्माण झाली आहे. लवकरच वाघोली व उर्वरित शहरातही या योजनेचा विस्तार करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक साधनसामग्री आणि नियोजन लवकरच करण्यात येईल,’ असे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.

घनकचरा व्यवस्थापनासाठी विमाननगर, भवानी पेठेत गेल्या ३० दिवसांपासून करण्यात आलेल्या प्रयोगाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या भागातील रस्त्यांवर, पदपथांवर दिसणारा कचरा गायब झाला आहे. हाच प्रयोग शहरातील इतर भागात राबविण्याचा प्रयत्न आहे. संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा विभाग, पुणे महापालिका