पुणे : देशभरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.या भटक्या श्वानांनी नागरिकांना चावल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एखाद्या व्यक्तीला श्वान चावल्यास त्या रुग्णाने डॉक्टरांकडे जाऊन वेळेत उपचार न घेतल्यास, त्या रुग्णाचा रेबीज या आजाराने मृत्यू झाल्याच्या घटना अनेक समोर आल्या आहेत.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मार्फत रेबीज मुक्त उपक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने दिल्ली, गोवा, जयपूर, बंगळूरु या ठिकाणी भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसविण्यात येत आहे, जेणेकरून त्या श्वानांचे लसीकरण करण्यात आले का, तो श्वान कुठे आहे, याबाबत मायक्रोचिपद्वारे माहिती मिळण्यास मदत होत आहे.आता महाराष्ट्रातील पुणे महापालिका प्रशासनाने भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तर अशा प्रकारचा निर्णय घेणारी पुणे महापालिका राज्यातील पहिली ठरली आहे.

या बाबत पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, पुणे शहर आणि आसपासच्या भागात मागील काही दिवसामध्ये भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता येत्या काळात पुणे शहरातील भटक्या श्वानांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तर आता भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप बसवण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला असून आमच्याकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून शहरात जवळपास ३ लाखांच्या आसपास भटके कुत्रे आहेत. पण आम्ही सध्याच्या घडीला प्रायोगिक तत्त्वावर ६०० कुत्र्यांना ‘मायक्रोचिप’ बसवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले, ही मायक्रोचिप तांदळाच्या आकारा एवढी आहे. ही चीप GPR ‘मायक्रोचिप’ बसविण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन NOIDEOLUND स्कॅनर मशीन यंत्राद्वारे मायक्रोचिप स्कॅनिंग करण्यात येणार आहे.वय,रंग, शस्त्रक्रियेची माहिती, कोणत्या परिसरातील आहे.या पूर्वी लसीकरणाची तसेच श्वान कुठल्या परिसरातील आहे.रेबीजचा संसर्ग झाला आहे का, नसबंदी झाली आहे का,याबाबतची माहिती या ‘मायक्रोचिप’द्वारे मिळणार आहे. तसेच ‘मायक्रोचिप’ ही श्वानांच्या खांद्याच्या भागात इंजेक्शनद्वारे टोचली जाणार आहे. यामध्ये आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तर या मायक्रोचिपला 15 अंकी युनिक नंबर असून या उपक्रमायाद्वारे मनपा हद्दीतील आणि नव्याने समाविष्ठ गावांमधील सर्व श्वांनाची माहिती, त्यांची संख्या समजण्यास मदत होणार आहे.

नसबंदी शस्त्रक्रिया करताना श्वानांना आधार कार्ड प्रमाणे नंबर मिळणार आहे.स्कॅनरच्या मदतीने श्वानांचा खांद्यावरील चीप स्कॅन करून त्या क्रमांकाच्या आधारे भटक्या कुत्र्यांची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.मायक्रोचीप असलेल्या श्वानांचे चीप स्कॅन केल्यानंतर शस्त्रक्रिया आणि लसीकरण याची सर्व माहिती तातडीने प्राप्त होऊन सदर श्वानास लसीकरण करणे याबाबत नियोजन करता येईल. पुणे महानगरपालिके कडून सुरु असलेले भटक्या कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया आणि अॅन्टी रेबीज लसीकरण करण्याचे उद्दिष्ठ यामुळे पूर्ण करता येऊ शकेल,असे त्यांनी यावेळी सांगितले.