पुणे : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांचे संवर्धन आणि देखभालीसाठी महापालिकेचा ३६ लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. कोणत्या भागातील आणि किती झाडांची देखभाल करायची, याची कोणतीही माहिती या प्रस्तावात नाही. विशेष म्हणजे गेल्या फेब्रुवारी महिन्यात काढण्यात आलेली ही निविदा मान्यतेसाठी आता स्थायी समितीपुढे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे खर्चाच्या या निविदा प्रस्तावात गौडबंगाल असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांत वृक्षारोपण केले जाते. महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात ५१ लाख ३७ हजार ६३२ झाडांची नोंद आहे. त्यामध्ये ४३० विविध प्रजातींचे वृक्ष आहेत. महापालिकेकडून मेट्रो आणि मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरूज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेअंतर्गत ७० हजार झाडांचे रोपण केले जाणार आहे. महापालिका प्रशासनाने यापूर्वी लावलेल्या झाडांच्या देखभाल आणि संवर्धनासाठी महापालिका प्रशासन ३६ लाखांचा खर्च करणार आहे. मात्र, हा खर्च वादग्रस्त ठरणार आहे.

हेही वाचा : मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला?…उमेदवारांची चाचपणी सुरू

महापालिका प्रशासनाने २८ फेब्रुवारी ते ९ मार्च या दरम्यान त्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविली होती. ती १० मार्च रोजी उघडण्यात आली. मात्र, ही निविदा मान्यतेसाठी नव्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) ठेवण्यात आली आहे. कोणत्या भागात ही झाडे लावण्यात आली आहेत आणि किती झाडांचे संवर्धन, देखभाल करण्यात येणार आहे, याची कोणतीही माहिती या निविदेत देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही निविदा संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे. याबाबतचे ठोस उत्तर उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडेही नाही. मात्र, मार्च महिन्यात काढलेल्या निविदेला सहा महिन्यांनी मान्यता देण्याचा अजब प्रकार महापालिका करणार आहे.

हेही वाचा : अजित पवारांकडे पालकमंत्रिपद आल्याने बारणे, लांडगेंची कोंडी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहराचे हरित क्षेत्र कमी होत असल्याचा आरोप शहरातील स्वयंसेवी संस्था सातत्याने करत आहेत. वृक्ष गणना करताना किंवा वृक्षारोपण करताना झाडांचे स्थान, प्रकाशचित्रे, शास्त्रीय नाव, झाडाची उंची, खोडाचा घेर आदी माहिती देणे आवश्यक आहे. हीच बाब झाडांचे संवर्धन करतानाही बंधनकारक आहे. मात्र, त्यानंतरही महापालिकेच्या उद्यान विभागाने त्याकडे दुर्लक्ष करत निविदा मंजुरीचा घाट घातला आहे.