पिंपरी : महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्या दृष्टीने ठाकरे गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली असून, पिंपरीतील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी नुकतीच ठाकरे यांची भेट घेतली. महायुतीकडून शिंदे यांच्या शिवसेनेला जागा मिळण्याची आणि खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारीची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मावळात दोन्ही शिवसेनेतच सामना होऊ शकतो. तर, मावळात ताकद असतानाही अजित पवार गटाला माघार घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत.

मावळमध्ये पुण्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगडमधील पनवेल, कर्जत, उरण या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. गेल्या तीनही निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये लढत झाली. तीनही वेळी शिवसेनेने बाजी मारली. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता परिस्थिती बदलली आहे. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत आहेत. हे तिन्ही पक्ष महायुती म्हणून तर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. त्यात मावळ मतदारसंघ ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार आहे. तर, मावळ लोकसभा शिंदेच्या शिवसेनेला, तर विधानसभेला मावळ, पिंपरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तर चिंचवड आणि भोसरी भाजपकडे राहिल असे सूत्र महायुतीचे ठरल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा : अजित पवारांकडे पालकमंत्रिपद आल्याने बारणे, लांडगेंची कोंडी?

महायुतीकडून आपली उमेदवारी निश्चित असल्याचा खासदार बारणे यांनी दावा केला असून चिन्ह कोणते असणार याबाबत साशंकता आहे. ठाकरे गटानेही उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. त्या दृष्टीने भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी नुकतीच मातोश्रीवर उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यामुळे यावेळेस दोन्ही शिवसेनेच्या आणि पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. वाघेरे आणि बारणे यांची शहरात नातीगोती असल्याने मतांची विभागणी होऊ शकते. त्याचा फटका खासदार बारणे यांना बसू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शहर दौऱ्यावर असताना आवर्जून वाघेरे यांची भेट घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडची खुशी मुल्ला १९ वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाची कर्णधार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार गटाची माघार?

मावळ मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. रायगड जिल्ह्यातील सुनील तटकरे त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पिंपरी, मावळचे आमदार त्यांच्यासोबत आहेत. चिंचवड, पनवलेला भाजपचे, कर्जतमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे, तर उरणला अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे मावळात ताकद आणि तीन निवडणुकांचा अनुभव असताना पवार यांना महायुतीत माघार घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत.