पुणे : विजयादशमी (दसरा) हा हिंदू संस्कृती मधील प्रमुख सण असून तो आश्विन शुद्ध दशमीला साजरा केला जातो. या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून अन्याय, अधर्म व दुष्ट शक्तींवर विजय मिळविला, अशी परंपरा सांगितली जाते. सत्याचा असत्यावर विजय आणि चांगल्याचा वाईटावर विजय याचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. गुरुवारी (२ ऑक्टोबरला) विजयादशमी साजरी केली जात आहे.
दसरा सण साजरा करताना या दिवशी शस्त्रपूजा, वाहनपूजा, वही, पुस्तक यांचे पूजन केले जाते. घराला आंब्याच्या झाडांची पाने लावली जातात. तसेच आपट्याची, शमी वृक्षाची पाने सोन्याप्रमाणे मानून एकमेकांना दिली जातात. हा सण साजरा करण्यासाठी शहरातील अनेक भागात बेकायदा पद्धतीने आंबा, शमी, आपट्याच्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होते.
बेकायदा पद्धतीने आंब्याच्या झाडांची तोडल्या जाणाऱ्या फांद्या, पाने यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने जनजागृती सुरू केली आहे. दसरा सणानिमित्ताने आंबा, आपटा, कांचन, शमी यासह इतर कोणत्याही वृक्षांची तोड करू नये. कोणतीही व्यक्ती तसेच नागरिक बेकायदा पद्धतीने झाडांच्या फांद्या तोडताना सापडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
शहरातील कोणत्याही भागात अशा पद्धतीने झाडे अथवा त्यांच्या फांद्या तोडत असल्याचे प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यास त्यांनी तातडीने पुणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे तक्रार करावी. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी करतील. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेचे सहआयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण विभागाचे सदस्य सचिव अशोक घोरपडे यांनी सांगितले.
महापालिकेची परवानगी न घेता झाडे किंवा त्यांच्या फांद्या तोडणे हा गुन्हा आहे. तसेच अशा गुन्ह्यासाठी शासनाद्वारे अधिसूचित करण्यात येईल अशा पद्धतीचा वापर करून, एक लाख रुपयांपर्यंतचा दंड आहे. बेकायदा झाडांच्या फांद्या तोडताना आढळल्यास त्याच्याकडून एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा दंड घेण्याची तरतूद आहे, असे घोरपडे यांनी सांगितले.
असा आहे कायदा….
पुणे महापालिका अधिकार क्षेत्रास महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम १९७५ चा कायदा लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जनन अधिनियम १९७५ महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण व संवर्धन नियम २००९-३ मुंबई उच्च न्यायालय यांच्या २० सप्टेंबर २०१३ च्या आदेशान्वये वृक्ष प्राधिकरणाचे कामकाज करण्यात येत आहे.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१ या कायद्यानुसार विनापरवाना झाडे जाळणे, तोडणे, किंवा कोणत्याही प्रकारे झाडास हानी पोहचविणे अने कोणतेही कृत्य करणे हा गुन्हा आहे, अशा गुन्हयास शासनाद्वारे अधिसूचित करण्यात येईल अशा पद्धतीचा वापर करून, काढलेल्या मुल्याइतके एक लाख रुपयांपर्यंत रक्कमेच्या दंडाची शिक्षेची तरतूद आहे.