पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली असून, २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रभागाची संख्या एकने कमी होऊन ४१ झाली आहे. सदस्यांची संख्या एकने वाढून १६४ वरून १६५ वर पोहोचली आहे. चार सदस्यांचे ४० आणि पाच सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. हरकती आणि सूचनांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
तीन वर्षे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळाल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते शुक्रवारी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. २०११ या वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून प्रभागरचना करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ३४ लाख ८१ हजार ३५९ लोकसंख्येनुसार प्रभागरचना केली आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ४ लाख ६८ हजार, तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४० हजार आहे. या लोकसंख्येच्या आधारे १६५ नगरसेवकांची रचना असणार आहेत.
चार सदस्यांचे ४० आणि पाच सदस्यांचा एक असे ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, एम. जे. चंद्रन, महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर, नगरसचिव योगिता भोसले आदी उपस्थित हाेते.
महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाने निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करून ही प्रभाग रचना तयार करून ती राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठविली होती. त्याची तपासणी करत नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविली होती. निवडणूक आयोगाने त्याची तपासणी करून ही प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धीसाठी महापालिकेकडे पाठविल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.
प्रभाग रचना करताना चार सदस्यीय ४० प्रभागांतील लाेकसंख्या ही सरासरी ८४ हजार ३९६ इतकी गृहीत धरली गेली, तर पाच सदस्यीय प्रभागातील लाेकसंख्या ही कमीत कमी ९४ हजार आणि जास्तीत जास्त एक लाख १६ इतकी गृहीत धरण्याचे बंधन निवडणूक आयोगाने घातले हाेते. त्यानुसार ही प्रभाग रचना केल्याचा दावा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केला.
हरकती नोंदविण्यासाठी ठिकाणे
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत नागरिकांना त्यांच्या हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत. येत्या ४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नागरिकांना हरकती नोंदविता येणार आहे. महापालिका मुख्य भवन, १५ क्षेत्रीय कार्यालये तसेच सावरकर भवन येथील महापालिकेच्या निवडणूक कार्यालय अशा तीन ठिकाणी या हरकती नाेंदविता येणार आहेत. ४ सप्टेंबरनंतर महापालिकेकडे आलेल्या हरकतींची छाननी करून त्यावर सुनावणी घेतली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
प्रभाग क्रमांक ३८ सर्वांत मोठा, प्रभाग ३९ लहान
महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभागांच्या रचनेत सर्वांत मोठा प्रभाग आंबेगाव-कात्रज (प्रभाग ३८) हा ठरला आहे. या प्रभागाची लोकसंख्या १ लाख १४ हजार ९७० इतकी आहे. तर सर्वांत लहान प्रभाग अपर सुपर इंदिरानगर हा (प्रभाग ३९) ठरला आहे. या प्रभागाची लोकसंख्या ७५ हजार ९४४ इतकी आहे.