पुणे : खांबात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने आठ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना नाना पेठेत रविवारी घडली. या दुर्घटनेत आणखी एक मुलगा जखमी झाला असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

सायली डंबे (वय ८, रा. डोके तालीमजवळ, नाना पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेत एका मुलगा जखमी झाला असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली डंबे आणि मुले रविवारी दुपारी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात खेळत होते. त्या वेळी इनामदार चौकातील एका खांबाला सायलीचा स्पर्श झाला. या खांबात विद्युत प्रवाह उतरला होता. सायली आणि तिच्याबरोबर असलेला एक मुलाला विजेचा धक्का बसला. हा प्रकार तेथून निघालेल्या एका बसचालकाने पाहिला. त्याने तत्परता दाखवून दोघांना लाकडी बांबूने ढकलले, अशी माहिती या भागातील नागरिकांनी दिली.

दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल उपचार करण्यात आले. उपचारांदरम्यान सायलीचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर नाना पेठ परिसरात शोककळा पसरली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळकरी मुलीचा विजेचा धक्क्याने मृ्त्यू प्रकरणी महावितरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. दुर्घटना नेमकी कशी घडली. याबाबतचा अहवाल महावितरणकडून आल्यानंतर चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. – उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस