Pune Truck Accident: टँकरचे ब्रेक फेल झाले नव्हते, RTO तपासात मोठा खुलासा | Pune Navale Bridge truck accident police confirms RTO assessment revelas No brake failure in truck cause accident sgy 87 | Loksatta

Pune Truck Accident: टँकरचे ब्रेक फेल झालेच नव्हते, RTO तपासात मोठा खुलासा, पोलीस म्हणाले “चालकाने…”

पुण्यातील नवले पूलावर रविवारी रात्री भीषण अपघात, ४८ वाहनांना धडक दिल्यानंतर चालक फरार

Pune Truck Accident: टँकरचे ब्रेक फेल झालेच नव्हते, RTO तपासात मोठा खुलासा, पोलीस म्हणाले “चालकाने…”
पुण्यातील नवले पूलावर रविवारी रात्री भीषण अपघात (फोटो – पवन खेंग्रे/ इंडियन एक्सप्रेस)

पुण्यातील नवले पूलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर झालेल्या अपघातात टँकर चालकाने ४८ वाहनांना धडक दिली. यानंतर या गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातात जखमी झालेल्यांपैकी सात ते आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचं बोललं जात होतं. मात्र तपासादरम्यान यामागे दुसरं कारण असल्याचं स्पष्ट झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाली नसल्याचं समोर आलं आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर ही माहिती समोर आली आहे. चालकाने उतार असल्याने इंजिन बंद केलं होतं आणि गेअर न्यूट्रल करत ट्रक चालवत होता. पण वेळेवर ब्रेक दाबू न शकल्याने त्याने ४८ गाड्यांना धडक दिली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नवले पुलाजवळ भरधाव टँकरच्या धडकेत ४८ वाहनांचे नुकसान; ७ ते ८ जणांवर उपचार सुरू

दुर्घटनेनंतर घटनास्थळावरुन फरार झालेल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. मणिराम छोटेलाल यादव असं या चालकाचं नाव असून, तो मध्य प्रदेशचा आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर रविवारी रात्री टँकरच्या धडकेने ४८ वाहनांचं नुकसान झालं. जखमींची संख्या सुमारे ३५ ते ४० होती. किरकोळ जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या सात ते आठ जखमींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) अग्निशमन दल; तसंच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि हेल्प रायडर्स संघटनेच्या स्वयंसेवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातातील जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल केले. टँकरच्या धडकेमुळे ४८ वाहनांचे नुकसान झाले. अपघातात दुचाकी, मोटारी, रिक्षा आणि टेम्पोचे मोठे नुकसान झाले.

बाह्यवळण मार्गावर वेगाने निघालेल्या टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचा पोलिसांचा अंदाज होता. दरम्यान सहाय्यक पोलिस आयुक्त (सिंहगड रस्ता विभाग) सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरटीओने वाहनाची तपासणी केली असता, ब्रेक फेल झालं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. प्राथमिकदृष्ट्या चालकाने इंधन वाचवण्यासाठी उतारावर इंजिन बंद करत न्यूट्रल गेअरवर गाडी चालवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. पण नंतर वाहनाने वेग पकडल्याने तो ब्रेक दाबू शकला नाही”.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-11-2022 at 12:41 IST
Next Story
पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना स्मार्ट ओळखपत्राचे वाटप; बंद असलेली बायोमॅट्रिक्स यंत्रणाही सुरू