पिंपरी : महामेट्रो, अर्बन स्ट्रीट आणि जलवाहिनीच्या कामासाठी केलेल्या रस्तेखाेदाईमुळे निगडी ते पिंपरी या सेवा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर माेठे खड्डे पडले आहेत. वाहतूक नियंत्रण दिव्यांचा कालावधी अधिक असल्याने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निगडी ते पिंपरी मार्गावर महामेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोचे खांब उभारण्यासाठी खोदाई केली आहे. यासाठी सुरक्षा कठडे उभारले असून, त्याच्या आत हे काम सुरू असते. या कामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. बीआरटी मार्गामध्ये जलवाहिनीची खोदाई सुरू आहे. त्यामुळे पीएमपी बससुद्धा सेवा रस्त्यावरूनच धावत आहेत. सेवा रस्त्याची रुंदी कमी झाल्याने यातून मार्ग काढताना वाहनचालकांना माेठीच कसरत करावी लागत आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, माेरवाडी या सर्व महत्त्वाच्या चौकांतील सिग्नलचा कालावधी अधिक असल्याने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागत आहेत. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी अर्धा किलाेमीटर अंतरासाठी चालकांना वीस मिनिटे लागत आहेत.
चेंबरच्या कामामुळे तासभर कोंडी
सेवा रस्त्यावर बजाज ऑटाे, आकुर्डी शुक्रवारी एक चेंबर खचल्याचे मेट्राे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे हे चेंबर तत्काळ बदलण्यासाठी निगडीकडून पिंपरीच्या दिशेने येणारी वाहतूक थांबविण्यात आली. या कामासाठी अर्धा तासाचा कालावधी लागला. तोपर्यंत मार्गावर माेठ्या प्रमाणात वाहतूककाेंडी झाली हाेती. भक्ती-शक्ती चाैकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. तासभर कोंडी कायम होती. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.
पालखी मार्गावर खड्डे
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून १८ जून रोजी प्रस्थान होणार असून, १९ जून रोजी ती आकुर्डीत मुक्कामी असणार आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चाैकात पालखी साेहळ्याचे पालिकेच्या वतीने स्वागत केले जाते. मात्र, या चाैकात मेट्राे मार्गासाठी माेठ्या प्रमाणात खाेदाई सुरू आहे. पिंपरीपर्यंत मेट्राे, अर्बन स्ट्रीट, जलवाहिनीसाठी रस्तेखाेदाई सुरू आहे. खड्डे पडले आहेत. पालखी साेहळा पाच दिवसांवर आला असताना मार्गावरील हे खड्डे कायम आहेत.
निगडी ते पिंपरी मार्गावरील दाेन्ही बाजूंच्या रस्त्यावरील खड्डे दाेन दिवसांमध्ये बुजविण्यात येतील. पालखी साेहळ्यादरम्यान १८ ते २० जून या कालावधीत मेट्रोचे काम बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, दळणवळण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मेट्राे, महापालिका अधिकाऱ्यांसाेबत शुक्रवारी बैठक झाली. निगडी ते पिंपरी मार्गावरील खड्डे बुजविण्याची सूचना केली आहे. वाहतूक पोलिसांसह मदतनीसांची नेमणूक केली जात आहे. चौकांमध्ये जास्त मार्ग एकत्र येत असल्याने सर्व मार्गांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी लाल सिग्नलचा कालावधी मोठा ठेवावा लागत आहे. तो कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विश्वजित खुळे, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक, निगडी वाहतूक विभाग