आरोग्य विभागातील गट क संवर्गातील पाच संवर्गातील भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार १५ आणि १६ ऑक्टोबरला परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात न्यास कम्युनिकेशन या खासगी कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या आरोग्य भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. त्यासंदर्भात पुणे पोलिसांत तक्रार दाखल झाला. पोलिसांनी केलेल्या तपासात संबंधित कंपनीच्या संचालकांसह आरोग्य विभागातील उच्चपदस्थ अधिकारीही या गैरप्रकारात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे सरकारवर टीकेची झोड उठली. त्यानंतर तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही भरती प्रक्रिया रद्द करत नव्याने परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. 

हेही वाचा – पुणे : देशभरात एकवीस बोगस विद्यापीठे ; यूजीसीकडून यादी जाहीर, राज्यातील एका विद्यापीठाचा समावेश

या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाकडून आरोग्य विभागाच्या गट कमधील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पाच संवर्गातील भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बिंदूनामावली अंतिम करण्यासाठी २७ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर, परीक्षा घेण्यासाठी कंपनीची निवड करण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत, निवड झालेल्या कंपनीने न्यास कंपनीकडून परीक्षेचा विदा हस्तांतरित करून घेण्यासाठी १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर, निवड झालेल्या कंपनीने संवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समितीला कळवण्यासाठी २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर, जिल्हा निवड समितीने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही करण्यासाठी २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर, जिल्हा निवड समितीने उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करून ते उमेदवारांनी डाऊनलोड करून घेण्यासाठी ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर, संगणकीय पद्धतीने परीक्षा १५ आणि १६ ऑक्टोबरला, तर उत्तरतालिका प्रसिद्ध करून उमेदवारांच्या हरकती सुचना घेणे, अंतिम निकाल जाहीर करून नियुक्ती आदेश देण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. तसेच या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालनात कसूर केल्यास शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा – पुणे : कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभासाठी आधार बंधनकारक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला ही सकारात्मक बाब आहे. मात्र जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा झाल्यास वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांची काही ठिकाणची परीक्षा चुकण्याची शक्यता आहे. ऑनलाइन परीक्षांसाठी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कंपन्यांची परीक्षा केंद्रे नाहीत किंवा संख्या मर्यादित आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये उमेदवारांची संख्या जास्त आहे, त्या जिल्ह्यात एकाच दिवशी सर्व उमेदवारांची परीक्षा कशी होणार हा प्रश्न आहे. परीक्षा एकाच दिवशी, एकाच वेळी ऑफलाइन पद्धतीने घेऊन उमेदवारांनी अर्ज भरलेल्या जिल्ह्यांसाठी त्यांचे गुण ग्राह्य धरले जावेत. – नीलेश गायकवाड, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती