भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत मतदार यादीत नाव नसलेल्यांना नाव नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय दुबार किंवा मृत मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत.
या उपक्रमांतर्गत ४ ऑगस्ट ते २४ ऑक्टोबर या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, प्रमाणीकरण करणे, दुबार, समान नोंदी, एका पेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, मतदारांचे छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा, विभाग / भाग यांची गरजेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्राच्या सीमांच्या पुनर्रचना करून मतदान केंद्राच्या यादीला मान्यता, आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पुरवणी आणि एकत्रित प्रारुप यादी तयार करण्यात येणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवारी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत, तर २६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.

मतदार म्हणून नोंदणी कशी कराल? 
मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, हे www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल उपयोजनवर (ॲप) संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ ही माहिती भरल्यानंतर समजेल. मतदार यादी नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक सहा भरावा, पत्ता बदलण्यासाठी आठ-अ, तर नाव वगळणीसाठी सात क्रमांकाचा अर्ज भरावा, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

शहरातील आठ मतदारसंघांमधील मतदार संख्या
वडगाव शेरी ४,७१,०१०, शिवाजीनगर २,९०,९१९, कोथरुड ४,३४,५७५, खडकवासला ५,४०,५७२, पर्वती ३,५६,२१२, हडपसर ५,५५,९१०, पुणे कॅन्टोन्मेंट २,८७,५३५, कसबा पेठ २,८६,०५७ असे शहरात एकूण मतदार ३२ लाख २२ हजार ७९० एवढे आहेत. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची संख्या ८१ लाख ५८ हजार ५३९ असून पुरुष मतदार ४२ लाख ७२ हजार ५३४ आहेत, तर महिला मतदारांची संख्या ३८ लाख ८५ हजार ६७६ एवढी आहे, असेही निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune opportunity to register name in voter list pune print news amy
First published on: 13-08-2022 at 11:15 IST