पुणे : नवरात्रोत्सवात सराइतांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. परिमंडळ एकमधील ४३ आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.पुणे पोलिसांच्या परिमंडळ एकमध्ये शिवाजीनगर, खडक, विश्रामबाग, फरासखाना, समर्थ आणि डेक्कन पोलीस ठाण्यांचा समावेश होतो. नवरात्रोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली ४३ सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

कारवाई करण्यात आलेल्या सराइतांविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, बेकायदा दारू विक्री, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही जण गुंड टोळ्यांशी संबंधित आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त रावले यांनी दिली.

नाना पेठेतील टोळीयुद्धातून आयुष कोमकर याचा खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती. त्यानंतर कोथरूड भागात नीलेश घायवळ टोळीतील सराइतांनी एकावर पिस्तुलातून गोळीबार केला, तसेच या भागात दहशत माजविण्यासाठी एका तरुणावर कोयत्याने वार केले होते. गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराइतांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.