पुणे : मेफेड्रोन विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून १२ लाख ४४ हजार रुपयांचे ६२ ग्रॅम मेफेड्रोन, दोन मोबाइल संच, दुचाकी असा १२ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
व्हेलेंटाइन उर्फ जेम्स अमुचे ईझेजा (वय ३५, सध्या रा. येवलेवाडी, कोंढवा, मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी कोंढव्यातील येवलेवाडी भागात गस्त घालत होते. त्यावेळी व्हेलेंटाईन मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने कोंढवा भागात सापळा लावला. तो दुचाकीवरुन तेथे आला. तो कोणाची तरी वाट पाहत थांबला होता. पोलिसांनी त्याच्या हालचाली टिपल्या. पोलिसांनी व्हेलेंटाईनला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याचाकडे मेफेड्रोन सापडले. मेफेड्रोन, दुचाकी, तसेच दोन मोबाइल संच जप्त करण्यात आले.
तो कोणाला मेफेड्रोन विक्री करणार होता, तसेच त्याने मेफेड्रोन कोठून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक दिंगबर कोकाटे, संदीप शिर्के, मारुती पारधी, विशाल दळवी, रेहाना शेख, दयानंद तेलंगे, सर्जेराव सरगर, विनायक दळवी, नागनाथ राख, विपुन गायकवाड, अक्षय शिर्के यांनी ही कारवाई केली.