पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा जवळचा साथीदार गुंड संतोष धुमाळ याच्याविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले. धुमाळ याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे २१ गुन्हे दाखल आहेत.

कोथरूड गोळीबार प्रकरणात नीलेश घायवळसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे शुक्रवारी आदेश दिले. नीलेश घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी घायवळचा जवळचा साथीदार संतोष धुमाळ याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्याचे आदेश दिले. धुमाळ मुळशी तालुक्यातील आहे. सध्या तो कोथरूड भागात वास्तव्यास आहे.

गोळीबार प्रकरणात मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांना अटक करण्यात आली. घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळवले असून, सध्या तो युराेपात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. घायवळला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस बजाविली आहे.

घायवळ याचे पारपत्र रद्द करण्याची विनंती पोलिसांनी शुक्रवारी विशेष न्यायालयाकडे केली. कोथरूड भागात नव्याने बांधण्यात आलेल्या एका इमारतीतील दहा सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी नीलेश घायवळ याच्यासह पिस्तूल परवान्यावरून चर्चेत असलेला त्याचा भाऊ सचिन घायवळ याच्यासह इतर सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घायवळविरुद्ध आतापर्यंत पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूड गोळीबार प्रकरण, वाहनाचा बनावट क्रमांक, बेकायदा शस्त्र बाळगणे, बनावट पारपत्र प्रकरण, खंडणी असे गंभीर गुन्हे घायवळविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत.