पुणे : पुणे पोलिसांकडून शुक्रवारी अचानक तीन ठिकाणी ‘माॅकड्रिल’ घेण्यात आले. डेक्कन जिमखाना, लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच विश्रांतवाडीतील एका लष्करी संशोधन संस्थेच्या परिसरात पोलिसांंसह विविध यंत्रणांनी सराव केला. या सरावाच्या माध्यमातून पोलिसांसह विविध यंत्रणांची सिद्धता तपासण्यात आली.

डेक्कन जिमखाना, महात्मा गांधी रस्ता, तसेच विश्रांतवाडी भागातील एका लष्करी संंशोधन संस्थेच्या परिसरात अनुचित घटना घडली असून, तेथे बाँम्बस्फोट घडल्याची माहिती विविध यंत्रणांना देण्यात आली. डेक्कन जिमखाना भागातील नामदार गोपाळकृष्ण गोखले चौक ते गरवारे भुयारी मार्ग परिसर, महात्मा गांधी रस्ता परिसरात त्वरित पुणे पोलिसांचे शीघ्र कृती दल (क्वीक रिस्पाॅन्स टिम), राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, अग्निशमन दल, बाँम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस), आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हा भाग तातडीने निर्मनुष्य करण्यात आला. वाहतूक पोलिसांनी त्वरित डेक्कन जिमखाना, महात्मा गांधी रस्ता, विश्रांतवाडी भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली.

अचानक वाहतूक वळविण्यात आल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. डेक्कन जिमखाना परिसरातील भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, कर्वे रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक अचानक बंद करण्यात आल्याने कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले. त्यानुसार वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्यानंतर प्रभात रस्ता, भांडाकरकर रस्ता परिसरातील गल्ली बोळात कोंडी झाली. दुपारी दोन ते चारपर्यंत शहरातील तीन महत्वाच्या ठिकाणी पोलिसांसह विविध यंत्रणांनी सराव केला. नागरिकांनी सुरुवातीला रस्ते का बंद केले, याबाबतची माहिती मिळाली नाही. पोलिसांनी सराव केल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

शहरातील महत्वाच्या ठिकाणी पुणे पोलिसांनी अचानक ‘माॅकड्रिल’ केले. त्या माध्यमातून पोलिसांसह विविध यंत्रणांनी सराव केला. नागरिकांना थोडा त्रास झाला. मात्र, अशा प्रकाराच्या सरावाची माहिती आधीच जाहीर करण्यात येत नाही. अचानक करण्यात आलेल्या सरावाच्या माध्यमातून पोलिसांसह विविध यंत्रणांची सिद्धता तपासली जाते. – डाॅ. संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा