पुणे : गुलटेकडीतील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ काॅलनीत एका ज्येष्ठ नागरिकाच्या बंगल्याचा बेकायदा ताबा पोलिसाच्या उपस्थितीत करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात प्रत्यक्ष तेथे उपस्थित राहून हस्तक्षेप केल्याप्रकरणी पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. संबंधीत पोलीस शिपाई शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहे. मात्र, बंगल्याची सीमाभिंत पाडून बेकायदा ताबा घेताना संबंधित पोलीस शिपाई तेथे उपस्थित असल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर त्याला पोलीस दलातून निलंबित करण्यचे आदेश देण्यात आले.

समीर जगन्नाथ थोरात असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, दिवंगत साहित्यिक ना. स. इनामदार यांचा ‘झेप’ बंगला आहे. बांधकाम व्यावसायिकाने ३१ ऑक्टोबर रोजी पूर्वसूचना न देता बंगल्याची संरक्षित भिंत पाडून लोखंडी गेट तोडले होते. तसेच बंगल्याचे नुकसान करून ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी इनामदार यांचे जावई सुभाषचंद्र गोपाळराव आरोळे (वय ८०, रा. झेप बंगला, ४२७/ ७८, टिमवि कॉलनी, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक आणि जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

इनामदार यांच्या मृत्यूपश्चात आरोळे कुटुंब या ठिकाणी राहण्यास आहे. बांधकाम व्यावसायिक आणि आरोळे यांच्यामध्ये खरेदीखत झाले आहे. आरोळे यांनी कागदोपत्री साडेसात कोटी रुपयांना हा बंगला विकला. खरेदीखत झाल्यानंतर तीन महिन्यांत ताबा देण्याचे ठरले. आरोळे यांनी खरेदीखताविषयी आक्षेप घेतले आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

पोलीस शिपाई समीर थोरात याची नियुक्ती पोलीस मुख्यालयात असतानाही तो बंगल्याची सीमाभिंत तोडताना तेथे हजर होता. या प्रकरणात त्याचा अनावश्यक हस्तक्षेप आढळून आला आहे. याबाबत परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहीते यांच्या कार्यालयाकडून अहवाल मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी थोरात याच्या निलंबनाचे आदेश दिले.

या प्रकरणात यापूर्वी स्वारगेट पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे. विजय नामदेव शिंदे असे निलंबीत कर्मचाऱ्याचे नाव आहे. बंगल्याचा बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी बंदोबस्तासाठी शिंदे यांना नेमण्यात आले होते. मात्र, शिंदे तेथे हजर नसल्याचे चौकशीत उघड झाले. त्यानंतर पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी निलंबनाचे आदेश दिले होते.