पुणे : पुणे शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन गृह विभागाने आणखी पाच नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली आहे. तसेच, दोन नवीन परिमंडळांच्या निर्मितीवर शिक्कामोर्तब केले आहे.

लक्ष्मीनगर (येरवडा), लाेहगाव, नऱ्हे, येवलेवाडी (कोंढवा), मांजरी अशा पाच नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तलयात सध्या पाच परिमंडळे आहेत. गृह विभागाने परिमंडळ सहा आणि सात अशा दोन परिमंडळाच्या निर्मितीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. नवीन पोलीस ठाणे, तसेच परिमंडळासाठी ८०० पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ मंजूर करण्यात आले आहे.

विमानतळ पोलीस ठाण्याचे विभाजन करून लोहगाव पोलीस ठाणे, हडपसर पोलीस ठाण्याचे विभाजन करून मांजरी पोलीस ठाणे, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे विभाजन करून नऱ्हे पोलीस ठाणे, येरवडा पोलीस ठाण्याचे विभाजन करून लक्ष्मीनगर पोलीस ठाणे, तसेच कोंढवा पोलीस ठाण्याचे विभाजन करून येवलेवाडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून बसविण्यात आलेल्या एआय तंत्रज्ञानावर आधाारित सीसीटीव्ही कॅमेरे योजनेचे उद्घाटन महिनाभरापूर्वी मु्ख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

त्या वेळी पुणे शहराचा विस्तार विचारात घेऊन नवीन पाच पोलीस ठाणी, तसेच नवीन परिमंडळांची निर्मितीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवीन पोलीस ठाणी, परिमंडळ निर्मितीचा प्रस्ताव पाठविला होता. पुणे पोलीस दलात आणखी सात पोलीस उपायुक्तांची पदे मंजूर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. पुणे पोलिसांनी सादर केलेले प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पोलीस ठाण्यांना जागा निश्चित करण्यात येणार आहे, तसेच लवकरच नवीन पोलीस ठाण्यांचे कामकाज सुरू केले जाणार आहे.

परिमंडळ, पोलीस ठाणी निर्मितीचे उद्दिष्ट

  • शहराचा वाढता विस्तार
  • कायदा, सुव्यवस्था अबाधित राखणे
  • नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण
  • गुन्हेगारीवर अंकुश

शहरात वर्षभरापूर्वी सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली होती. पुणे शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन आणखी नवीन पाच पोलीस ठाणी, तसेच परिमंडळ निर्मितीचा प्रस्ताव गृह आणि वित्त विभागाकडे पाठविला होता. गृह विभागाने अतिरिक्त मनुष्यबळ, परिमंडळ, पोलीस ठाणी निर्मिती, पोलीस उपायुक्त पदसंख्या अशा प्रस्तावांना मंजुरी दिली. ऑक्टोबर महिनाअखेरीपर्यंत नवीन पोलीस ठाण्यांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यात येणार आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त