पुणे : खराडी भागातील एका उच्चभ्रु साेसायटीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पत्ते, तसेच अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी सदनिका मालकासह २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

खराडीतील एका उच्चभ्रु सोसायटीतील सदनिकेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. सदनिकेत टेबल-खुर्च्या टाकून जुगार अड्डा चालविण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथून २४ जणांना ताब्यात घेतले. जुगार अड्डा चालविण्यासाठी सदनिका दिल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी सदनिका मालकासह महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गु्न्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली. आरोपींकडून पत्ते, जुगार खेळण्यासाठी वापरले जाणरे प्लास्टिक काॅईन जप्त करण्यात आले.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंढे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वजीत जगताप, सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे, उपनिरीक्षक राहुल कोळपे, गणेश घुले, श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, सुरेंद्र साबळे, श्रीकांत कोद्रे, सूरज जाधव, जयवंत श्रीरामे, विकास केदारी, वर्षा कर्डीले यांनी ही कारवाई केली.