पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी पदाधिकाऱ्यांविरुद्ध नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार नितीन खुटवड यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या महिलेबाबत असंवेदनशील वक्तव्य केल्याचा आरोप करून शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या धायरीतील गारमाळ परिसरात असलेल्या घरासमोर दुपारी सव्वातीनच्या सुमारास आंदोलन केले.
चाकणकर यांनी आत्महत्या करणाऱ्या महिलेबाबत असंवेदनशील वक्तव्य केले असून, त्यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविण्यााचा अधिकारी नाही, असे सांगून शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. ‘चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत, की महिलांचा अपमान करणाऱ्या प्रवक्त्या ? ’असा सवाल महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. पोलीस परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमृता पाटील तपास करत आहेत.
