पुणे : पुणे शहर आणि आसपासच्या भागात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास २ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. यामुळे नदी पात्रालगत राहणार्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान खराडीहून केशवनगरकडे जाणाऱ्या मुळा मुठा नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी एक दुचाकी चालक पुलावरून जात असताना पुढे जाऊन पाण्याच्या प्रवाहात अडकून बसला. या तरुणाला पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खराडीहून केशवनगर कडे जाणाऱ्या मुळा मुठा नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरील रस्ता बंद करण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी एक तरुण दुचाकीवरून जात असताना बंधाऱ्यावर मध्यभागी अडकल्याचे दिसून आले. त्या तरुणाला वाचवण्यासाठी अग्निशामक विभागाला तात्काळ कळवले.
परंतु पाण्याचा प्रवाह वाढत होता. तो तरुण पाण्यात वाहून जाण्याची शक्यता असल्याने स.पो.नि.खांडेकर , पोलीस अंमलदार दोरगे, पोलिस हवालदार सय्यद , पोलिस अंमलदार गायकवाड, महिला पोलीस अंमलदार थोरात, महिला पोलीस अंमलदार मालवंडे, पोलीस अंमलदार साळके , पोलिस अंमलदार काळे यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता दोरीच्या साह्याने मानवी साखळी बनवून त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले असल्याचे त्यांनी सांगितले.