पुणे : हजारो वारकरी, दर्शनासाठी भाविकांची उसळलेली गर्दी अशा भक्तिमय वातावरणात शुक्रवारी शहरात पालखी सोहळा दाखला झाला. पुणे पोलिसांचा या वेळ चोख बंदोबस्त होता. रात्री दहाच्या सुमारास श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा नाना-भवानी पेठेत मुक्कामी दाखल झाला.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी (२० जून) शहरात दाखल झाला. पालखी सोहळ्यातील बंदोबस्ताचे नियोजन पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त पालखी मार्गासह शहर परिसरात तैनात करण्यात आला होता. हजारो भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पालखी सोहळ्यातील अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली होती. पालखी मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह साडेसात हजार पोलीस बंदोबस्तात सहभागी झाले. श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडी, वारकऱ्यांना दुतर्फा झालेल्या गर्दीतून वाट करून देण्यासाठी पोलिसांनी वेगळा बंदोबस्त ठेवला होता.

प्रथेप्रमाणे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील नरवीर तानाजीवाडी परिसरात दोन्ही पालख्या दुपारी विसाव्यासाठी दाखल झाल्या. तेथेे भाविकांची गर्दी झाली होती. पालख्यांचे आगमन, मुक्काम, तसेच पालखी सोहळा मार्गस्थ होईपर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्री दहाच्या सुमारास संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा नाना पेठेतील निवंडुग्या विठोबा मंदिरात दाखल झाला. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मुक्कामी दाखल झाली. समाजआरती झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत दोन्ही मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. शनिवारी (२१ जून) पालखी सोहळा शहरात मुक्कामी असणार आहे. रविवारी (२२ जून) पालखी सोहळा शहरातून मार्गस्थ होणार आहे.