Shaniwarwada Namaz Jain Boarding Land Deal Pune Controversy : सरत्या आठवड्यात शहरातील मुख्य सभागृहांसह, मैदाने, उद्याने आणि अगदी गल्ली-बोळांत आयोजिलेल्या सर्व ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांना भरपूर गर्दी जमूनही शीर्षकात असा प्रश्न का बरे विचारला असावा, असे वाटेल. पण, तो लाक्षणिक अर्थाने नसून पुण्यात सध्या जे काही सुरू आहे, त्याबाबत पुणेकर जागरूक आहेत का, अशा अर्थाने अधिक आहे. अलीकडच्या काळात जो-तो उठतो, तो ‘पुणेकरां’ना नावे ठेवतो, तसे मात्र यात निश्चित अभिप्रेत नाही.

पुणेकर पुरेसे सूज्ञ आहेत आणि शहराच्या प्रश्नांबाबत गप्प असतात असे वाटले, तरी कोणत्या ‘वेळी’ त्यावर व्यक्त व्हायचे, हे जाणून असतात; उदाहरणार्थ, निवडणुकांत होणारे-न होणारे मतदान. समाजमाध्यमी कंठाळी स्वर म्हणजे जनमानस नसते, हे पुणेकरांना आणि एकूणच सगळीकडच्या सुजाण मतदारांना नक्की माहीत आहे. माध्यमांना ते कळेल, तो सुदिन. असो.

Pune Politics / पुण्यात काय बदलले?

गेल्या २५ वर्षांत पुणे जसजसे ‘जवळपास’ (पूर्ण महानगरासाठी अजून पूर्ण पात्र नाही म्हणून ‘जवळपास’) महानगर झाले, तसतसे येथील प्रश्नांनाही ‘बाहेरचे’ आणि ‘मूळचे’ अशी किनार येऊ लागली, जी मतदानाच्या आकडेवारीत आणि त्या आकडेवारीच्या अन्वयार्थांत हळूहळू प्रतिबिंबत होऊ लागली. त्याचा परिणाम म्हणजे राजकीय पक्षांचे लक्ष्य गट (‘टारगेट ग्रुप’ वा टीजी) आणि या गटांच्या आकांक्षापूर्तीचे पाठपुरावे त्या-त्या परिसरांनुसार बदलत गेले.

छटपूजेसाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्याची केली गेलेली मागणी हे एक आत्ताचे ताजे उदाहरण. महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला जोर आला, की त्यात आणखी भर पडेल. त्यातून शहराचे बदलते सामाजिक-सांस्कृतिक रूपही आकळत राहते. पण, म्हणून तेच मुद्दे निवडणुकांत निर्णायक ठरतात, असा सरसकट निष्कर्ष काढून चालणार नाही. ‘शनिवारवाड्यातील नमाजपठण’ आणि ‘जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार’ या पुण्यातील दोन घटना आणि त्यावरील प्रतिक्रिया व आरोप-प्रत्यारोपांकडे म्हणूनच आणखी व्यापकपणे पाहावे लागेल.

Pune Politics / सध्या पुण्यात काय सुरू आहे?

महापालिका निवडणुका महिना-दोन महिन्यांवर आलेल्या असल्याने पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. दिवाळी ही त्या दृष्टीने नांदी ठरली. तसे दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि आणखी काही सण-उत्सवांच्या निमित्ताने इच्छुकांनी आपल्या छब्या फलकांवर झळकवल्याही, दिवाळीत त्याला आणखी ऊत आला. सरंजाम वाटप, फराळ वाटपांच्या पिशव्यांवर झळकलेली इच्छुकांची छायाचित्रे, कार्यकर्ते, हितचिंतकांच्या फटाके, आकाशकंदिलांच्या स्टॉलवर दाखविलेली मेहेरनजर ते अगदी विशिष्ट रंगांची उपरणी देण्यापर्यंतचे ‘उपक्रम’ही राबविले गेले.

स्नेहमेळावे आणि ‘दिवाळी पहाट’च्या निमित्ताने पार गल्लोगल्ली केली गेलेली ‘भावी’ नगरसेवकांच्या त्या-त्या भागातील कामांची उजळणी हा त्याचा आणखी एक पदर. या सर्व उपक्रमांच्या आगेमागे ‘शनिवारवाड्यातील नमाजपठण’ आणि ‘जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार’ हे दोन मुद्दे तापले. शनिवारवाड्यातील नमाजपठण प्रकरणात भाजपच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी भूमिका घेतलेली दिसली. त्यानंतर नमाजपठण प्रकरणात गुन्हेही दाखल झाले.

मात्र, त्यांच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी जाहीर टीका केली. जैन बोर्डिंग जागेच्या व्यवहारासंदर्भात विश्वस्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून जैन समाजाचा मोठा मोर्चा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघाला, पण त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा कथित सहभाग असल्याचा आरोप अधिक जोरकसपणे करून त्यात सातत्य ठेवले, ते शिवसेना (शिंदे) पक्षाचे रवींद्र धंगेकर यांनी.

Pune Politics / विरोधकांची भूमिका काय?

राजकीय दृष्टीने या दोन्ही प्रश्नांकडे पाहायचे, तर मूळ विरोधक असलेल्या काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांपेक्षा महायुतीतीलच पक्ष भाजपविरोधात आवाज उठवताना दिसतात, याचे राहून राहून आश्चर्य वाटते. बरे, शहरासमोर या मुद्द्यांहून आणखी महत्त्वाचे प्रश्न आहेत, असे विरोधी पक्षांना वाटत असेल, तर तसे ठामपणे म्हणून वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यांची दुर्दशा, असुरक्षितता हे पुणेकरांना रोज भेडसावणारे प्रश्न मांडण्याचे सातत्य दाखविणेही त्यांना जमत नाही, ही शोकांतिका उरतेच.

शनिवारवाडा किंवा जैन बोर्डिंग या दोन्ही मुद्द्यांना समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर ‘अवकाश’ मिळाला. त्याने चर्चा-चर्विचण खूप होत राहते, पण नवा मुद्दा मिळाला, की पहिला मागे पडतो, हा समाजमाध्यमी नियम यालाही लागू होऊन मूळ प्रश्न रेंगाळतच राहू शकतो, हे विरोधकांना कळते आहे का? शिवाय, सध्या हे समाजमाध्यमी अवकाशसुद्धा महायुतीने व्यापले आहे, हाही यातील विचार करण्याजोगा भाग. आमनेही महायुतीतील पक्ष आणि सामनेही महायुतीतीलच पक्ष.

पर्यायाने खऱ्या विरोधकांना महायुतीने यात ‘अवकाश’च दिलेला नाही. वर गोची अशी, की भाजपविरोधात भूमिका घेतलेल्या महायुतीतील पक्षाला पाठिंबा देणेही विरोधकांना राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. पण मग त्यावर, ‘विरोधाचे हे इतके गंभीर मुद्दे आहेत, तर तुम्ही भाजपबरोबर का आहात,’ असा उलटा प्रश्नही ते महायुतीतील इतर दोन पक्षांना विचारताना दिसत नाहीत. सध्या उपस्थित झालेल्या किंवा यापुढे उपस्थित होऊ शकणाऱ्या मुद्द्यांवरून महायुतीतील तिघांच्या भांडणात आपला लाभ होईल, असे विरोधकांनी गृहीत धरले असेल, तर त्यांनी मतदारांनाही गृहीत धरले आहे.

Pune Politics / राजकीय वळणांचे रस्ते

उपरोल्लेखित दोन्ही प्रकरणांना सध्या राजकीय वळणे लागल्याचे स्पष्ट दिसतेच आहे. हे सर्व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने विशेषत: भाजपला त्याचा फटका बसेल, अशा निष्कर्षाप्रतही अनेक विश्लेषक येताना दिसतात. तो बसणारच नाही, असे ठामपणे म्हणता येत नाही, हे नक्की, पण यात महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरासमोर असलेल्या इतर काही मूळ प्रश्नांवरून लक्ष उडते आहे, हेही तितकेच खरे.

अगदी या दोन प्रकरणांच्या संदर्भानेही मूळ प्रश्न ऐरणीवर आणता येण्यासारखे असूनही ते आणले जात नसल्याचे दिसते. पुण्याने दिलेला पुरोगामी विचार, वैज्ञानिक दृष्टी, पुण्याची म्हणून ओळख असलेला सुसंस्कृतपणा याची आठवण ठेवून समन्वयाची भाषा पुन्हा रुजविण्याची गरज या शहराला आहे, अशी भूमिका कोणताही राजकीय पक्ष शनिवारवाडा प्रकरणानंतर मांडताना दिसला नाही. आव्हाने-प्रतिआव्हानेच अधिक दिली गेली. सामान्य पुणेकराला हे मान्य आहे का, असा विचार खरेच कुणी केला आहे का? जैन बोर्डिंगच्या जागेच्या प्रश्नाचेही तसेच. या निमित्ताने एकूणच शहरात सुरू झालेला पुनर्विकासाचा हव्यास आणि त्यामुळे निर्माण होत असलेले प्रश्न यावर बोलताना कुणी दिसत नाही.

अनियोजित पुनर्विकासामुळे पिण्याचे पाणी, सांडपाणी निचरा, रस्त्यांची वहनक्षमता अशा पायाभूत सुविधांवर येणारा ताण पुणेकरांचे जगणे मुश्कील करतो आहे, आणखी करणार आहे हे कुणालाच दिसत नाही का? राजकीय नेत्यांचे बांधकाम व्यावसायिकाबरोबर हितसंबंध असल्याचे वैयक्तिक आरोप करताना, असे कुणाचेही हितसंबंध संपूर्ण शहराला खड्ड्यात घालणारे ठरू शकतात, हे कुणी बोलणार नाही, कारण त्यात सगळेच राजकीय पक्ष उघडे पडणार आहेत.

नीट नियोजन नसल्याने विकासाच्या नावाखाली लागत असलेली शहराची वाट हा येत्या निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा असल्याचे भान राजकीय पक्षांकडून निसटणे हा पुणेकरांचा पराभव असेल. ही नुसत्या लुटुपुटुच्या लढाया खेळण्याची वेळ नाही, तर पुणे नावाच्या निर्नायकी शहराच्या बाजूने उभे राहण्याची आहे. म्हणूनच त्यासाठी आता पुणेकरांनीच ‘जागे’ राहणे गरजेचे आहे.

siddharth.kelkar@expressindia.com