Pune Poster : पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्या अशी मागणी भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी मंगळवारी केली होती. त्यानंतर ठाकरेंच्या सेनेने बॅनर लावले. या बॅनरवर मेधा कुलकर्णींचा उल्लेख कोथरुडच्या ताई असा करण्यात आला. हे बॅनर आता उतरवण्यात आले मात्र पुण्यात या बॅनर्सची चांगलीच चर्चा रंगली.
मेधा कुलकर्णी यांनी काय मागणी केली?
“पंतप्रधान मोदी यांची संकल्पना आहे की देशातील रेल्वेस्थानकं, विमानतळं अशी असली पाहिजेत की तिथे त्या शहराच्या, आपल्या देशाच्या इतिहासाचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. तेच आता पुण्यातही व्हायला हवं. पुणे रेल्वेस्थानकाचं नुतनीकरण करताना स्थानक परिसरात पुण्याच्या इतिहासाचं प्रतिबिंब दिसावं. प्रामुख्याने पुणे रेल्वेस्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं अशी मागणी मी केली आहे.” असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या होत्या. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत मेधा कुलकर्णींनी ही प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर ठाकरेंच्या सेनेने या मागणीची खिल्ली उडवणारे बॅनर लावले होते, जे आता काढण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या सेनेने लावलेले बॅनर्स काय?
पुण्यातल्या मुख्य रस्त्यांवरचे बॅनर लक्ष वेधून घेत होते. यात मेधा कुलकर्णी यांचं एक व्यंगचित्र दाखवण्यात आलं होतं. त्यात असा उल्लेख होता की कोथरुडच्या बाई आपणांस नामांतराची इतकी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करावं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण आणि उपविभाग प्रमुख गिरीश गायकवाड यांचे फोटोही या बॅनरवर आहेत. या बॅनरवरुन वाद निर्माण होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर हे बॅनर काढण्यात आले.

महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव द्यावे – सचिन खरात
पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केल्याचे समजत आहे. परंतु या नावाला आमचा विरोध आहे. रयतेचे राजे शिवाजी महाराजांची समाधी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधली आणि पुढे जाऊन शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा साजरी केली, आणि याचा उल्लेख तत्कालीन वर्तमानपत्र दिनबंधू यांमध्ये आहे. तसेच स्त्री शिक्षणाचा यशस्वी लढा दिला, त्यामुळे आमचा पुणे रेल्वे स्थानकाला थोरला बाजीराव पेशवे नाव देण्यास विरोध आहे आणि आमची मागणी आहे की क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव पुणे रेल्वे स्टेशन ला देण्यात यावे, असे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात म्हटलं आहे.