पुणे : कोहळा (भोपळा) ही फळभाजी वर्षभर उपलब्ध असली, तरी दिवाळीत पूजेसाठी कोहळ्याला मागणी असते. यंदा दिवाळीत मागणी वाढल्याने १० ते २० रुपये किलो असलेल्या कोहळ्याला २० ते ६० रुपये दर मिळाल्याने कोहळा उत्पादकांची ‘दिवाळी’ झाली.

सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कोहळ्याची लागवड करतात. कोहळा ही फळभाजी वर्षभर उपलब्ध असते. मात्र, दिवाळीत धनत्रयोदशीपासून कोहळ्याला मागणी वाढते. कोहळ्याची पूजा करून तो व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात बांधण्याची परंपरा आहे.

पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात एक किलो कोहळ्याला सरासरी १० ते २० रुपये दर मिळताे. दिवाळीत किरकोळ बाजारात एक किलो कोहळ्याला २० ते ६० रुपये दर मिळाला. ‘शेतकऱ्यांसाठी कोहळा लागवड ही चांगल्या नफ्याचे हंगामी पीक ठरले आहे. कोहळा जास्त काळ टिकतो. धार्मिक विधीसाठी कोहळ्याला मागणी असते. मर्यादित उत्पन्न आणि ठरावीक काळासाठी मागणी असल्याने किरकोळ बाजारात मोजक्याच विक्रेत्यांकडे कोहळे विक्रीसाठी उपलब्ध असतात. १० ते २० रुपये किलो दर असणाऱ्या कोहळ्याला सणासुदीच्या काळात चांगला दर मिळतो’, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी सांगितले.

कोहळा लागवडीसाठी साधारणपणे तीन महिन्यांचा कालावधी लागतो. कोहळा लागवडीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते. नवरात्रोत्सव, दिवाळीत कोहळ्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला. – औदुंबर पवार, कोहळा उत्पादक, खंडाळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर