पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळामुळे जमिनीचे भाव वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, या परिसरातील गावांमध्ये बोगस दस्तनोंदणी होत आहे का, असा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला असता, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे काही प्रकार झाल्याचे सांगितले.
शहरालगतचा प्रस्तावित रिंग रोड आणि पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुरंदर तालुक्यातील जमिनींची मागणी वाढली आहे. त्यातच पुरंदर तालुक्यामध्येच विमानतळ होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येथील जागा खरेदी-विक्रीच्या व्यवहारात लक्षणीय वाढ झाली आहे.
विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर विमानतळासाठी ज्या सात गावांमध्ये विमानतळ होणार आहे, त्यालगतच्या गावांमधील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. या संदर्भात आमदार आशिष देशमुख यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विमानतळ परिसरातील गावांमधील बोगस दस्तनोंदणीच्या प्रकाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
‘पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित नवीन विमानतळामुळे जमिनींचे भाव वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून विमानतळ परिसरातील गावांमध्ये बोगस दस्तनोंदणीचे प्रकार होत आहेत का? बोगस दस्तनोंदणी होत असल्यास बनावट कागदपत्रांद्वारे नव्या खरेदीदाराचे नाव अधिकाऱ्यांच्या संगनमताने सातबारा उताऱ्यावर लावण्यात येत असल्याची बाब खरी आहे का? याप्रकरणी किती गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे? त्याचा तपशील काय आहे? या सर्व प्रकाराबाबत राज्य शासनाने काय चौकशी केली? आणि कोणावर कोणती कारवाई केली,’ अशी विचारणा देशमुख यांनी बावनकुळे यांच्याकडे केली.
त्यावर बावनकुळे यांनी उत्तर दिले, ‘विमानतळामुळे बोगस दस्तनोंदणी होत असून, पुरंदर येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ यांच्या कार्यालयात मार्च महिन्यामध्ये मौजे खानवडी येथील शेतजमिनीचे साठेखत २५०१/२२५ या क्रमांकाने मूळ मालकाऐवजी नोंदणीकृत झाले आहे. मात्र, बनावट कागदपत्रांद्वारे नव्या खरेदीदाराचे नाव अधिकाऱ्यांच्या संगनमताने सातबारा उताऱ्यावर लावण्यात आलेले नाही, तर मूळ व्यक्तीऐवजी बनावट व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाल्याने दुय्यम निबंधकांकडून नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यासाठी सासवड पोलीस स्थानकाला पत्राद्वारे सूचना करण्यात आली आहे.’
दरम्यान, विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधील २ हजार ६७३ हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. या परिसरात एक गुंठ्यापासून अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लाॅटिंग करण्यात आल्याची चर्चा आहे. तर दिवे, चांबळी, सोनोरी आणि गराडे या गावांमधील रिंग रोड प्रस्तावित आहे. रिंग रोडसाठी बहुतांश भूसंपादन झाले आहे. रिंग रोडसाठी संपादित झालेल्या जमिनींना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर पाचपट दर देण्यात आला आहे.