पुणे : श्रावण महिन्यामध्ये श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे होणारी गर्दी आणि व्हीआयपी दर्शनावरून होणारा वाद टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने क्यूआर कोडचा पर्याय निवडला आहे. भाविकांना क्यू आर कोडच्या माध्यमातून व्ही. आय.पी. दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्रावणी सोमवार यात्रा नियोजन बाबत आढावा बैठक, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, प्रशासकीय व्यवस्थापक प्रमोद शिर्के, सह-कार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, खेडचे तहसिलदार प्रशांत बेद्रे, आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक व अन्य विभागाचे संबधीत अधिकारी उपस्थित होते.
श्री क्षेत्र भीमाशंकरला श्रावण महिन्यात येत्या सोमवारपासून दर्शनासाठी येणाऱ्या भावीकांची मोठी गर्दी लक्षात घेता एक रांग व्ही.आय.पी. दर्शन व दुसरी साधी दर्शन रांग अशा दोन रांगेत दर्शन घेता येईल अशी व्यवस्था करावी. तसेच दर्शन, पुजा करण्यासाठी निश्चित टप्पा तयार करावे. वाहनतळाची ठिकाणे पोलिस विभागाने निश्चित करुन त्या ठिकाणी चार्जिगची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. वन विभागानेही पाहणी करुन रस्त्यातील अडथळे दुर करावेत. भाविकांची गैरसोय होवू नये व त्यांना चांगल्या सुविधा देता याव्यात. यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करुन दक्ष राहण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
या कामास प्राधन्य देवून येत्या रविवार पर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत. तसेच मंदिर परिसर, भिमाशंकर गाव, मंचर या ठिकाणी क्यूआर कोड बाबत माहिती देणारे फलक लावण्यात यावेत. क्यूआर कोडच्या माध्यमातून व्ही.आय.पी. दर्शन सुविधा उपलब्ध करुन द्यावी. तसेच क्यूआर कोडद्वारे मंदीर संस्थानमार्फत भाविकांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती उपलब्ध होईल त्या दृष्टीने व्यवस्था करावी, असे डुडी सांगितले.
भीमाशंकरचा तीर्थक्षेत्र आराखडा
दरम्यान कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकरचा पर्यटन आराखडाही जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असेल्या भीमाशंकरच्या (ता. आंबेगाव) विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करून कुंभमेळ्याच्या आधी या क्षेत्राचा सुनियोजितपणे दर्जेदार विकास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहे.
हा आराखडा २८८ कोटींचा असून इको टुरिझम वाहतूक आणि सुरक्षा सुविधांचा दर्जा उंचविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच भीमाशंकर येथील दळणवळण सुविधा, वाहतूक मार्ग, अंतर्गत रस्ते यांच्या विकासास प्राधान्य देण्यात येणार आहे. याठिकाणी हेलीपॅड सुविधा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन असून परिसराचा विकास करताना स्थानिक व्यावसायिक, दुकानदारांना नवीन दुकाने उपलब्ध करून देण्याची सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.