पुणे : मध्ये रेल्वेच्या पुणे विभागातून दूर्गापूजा, छट पूजा आणि दिवाळीनिमित्त उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी नेहमीच गर्दी असते. त्या पार्श्वभूमीवर पुणे स्थानकावरून नागपूर, दिल्ली, गोरखपूर आणि सिरसा या ठिकाणांवर विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय़ पुणे रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. २७ सप्टेंबरपासून वेगवेगळ्या मार्गांनुसार या गाड्या धावणार असून प्रवाशांना नेहमीच्या प्रवासी शुल्कापेक्षा १.३ पटीने जादा शुल्क जादा मोजावे लागणार आहे.
व्यवसाय, नोकरी, उद्योग, शिक्षण आणि इतर कामांनिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या उत्तरेतील रहिवाशांचे पुण्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. दिवाळी आणि छट या सणांनिमित्त गावी जाण्यासाठी उत्तर भारतीयांची मोठी गर्दी असते. अनेकदा प्रवाशांना गाडीचे आरक्षण मिळत नसल्याने पर्यायी वाहतुकीद्वारे गाव गाठावे लागते. त्यामुळे या मार्गावर अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे विभागाने पुण्यातील पुणे-गोरखपूर-पुणे ही विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही रेल्वे (क्रमांक ०१४१५) २७ सप्टेंबरपासून दररोज सकाळी ६.५० मिनिटांनी पुणे स्थानकावरून गोरखपूरला रवाना होईल. दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, झाशी, कानपूर, लखनौ या थांब्यांवर ही गाडी थांबाणार असून, दुपारी ४.०० वाजता गोरखपूर रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे, तर तर ०१४१६ ही गाडी गोरखपूर रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ५.३० वाजता पुण्याच्या दिशेने परतीच्या प्रवासासाठी निघेल, अशी रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पुणे ते दिल्ली साप्ताहिक विशेष रेल्वे
त्याचबरोबर २६ सप्टेंबरपासून २८ नोव्हेंबरपासून पुणे ते दिल्ली हजरत निजामुद्दीन स्थानक दरम्यान गाडी क्रमांक ०१४९१ ही विशेष रेल्वे आठवड्यातून एक दिवस सोडण्यात येणार आहे. दर शुक्रवारी पुणे स्थानकावरून ही रेल्वे सायंकाळी ५.३० वाजता पुणे स्थानकावरून निघेल आणि शनिवारी दिल्ली स्थानकावरून शनिवारी ९.२५ वाजता पुण्याच्या दिशेने निघत रविवारी रात्री ९.५५ वाजता पुणे रेल्वे स्थानकात पोहचणार आहे.
पुणे ते नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट
नागपूरला जाण्यासाठी गाडी क्रमांक ०१२०९ -०१२१० ही साप्ताहिक विशेष रेल्वे नागपूर स्थानकापर्यंत सोडण्यात येणार आहे. २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत ही गाडी या मार्गावर धावणार आहे. प्रत्येक आठवड्यातील प्रत्येक रविवारी दुपारी ३.५० मिनिटांनी पुणे स्थानकावरून नागपूरच्या दिशेने रवाना होणार असून सोमवारी सकाळी ६.३० वाजता नागपूर स्थानकात पोहचेल.
पुणे ते सिरसा साप्ताहिक एक्सप्रेस
गाडी क्रमांक ०१४३३-३४, पुणे ते सिरसा ही विशेष साप्ताहिक विशेष एक्सप्रेस २४ सप्टेंबरपासून २६ नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातील बुधवारी पुणे स्थानकावरून सकाळी ९.४५ वाजता पुणे स्थानकावरून निघेल, तर गुरुवारी सकाळी ५.४० वाजता सिरसा येथे पोहचणार आहे.
डबे आणि सुरक्षिततेचे नियोजन
या गाडीसाठी १८ प्रवासी डबे असून, ज्यामध्ये सहा सामान्य डबे, सहा आरामदायी डबे, चार वातानुकूलित डबे आणि दोन द्वितीय श्रेणीतील अशी गाडीची रचना असेल. गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने नियंत्रणासाठी अतिरिक्त रेल्वे पोलिस बलातील कर्मचारी तैनात करण्यासाठी नियोजन केले आहे. त्याचबरोबर तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी विशेष तपासणी पथक, विद्युत तपासणी, स्वच्छता, पाणी आणि निर्जंतुकीकरण आदी बाबींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी सांगितले.