पुणे : रेल्वे प्रवाशांचे मोबाइल संच चोरणाऱ्या चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून २० मोबाइल संच जप्त करण्यात आले. बुद्धराज मोरपाल बागडी (वय ३२), अमरलाल हंसराज बागडी (वय २२, दोघे मूळ रा. बारा, राजस्थान, सध्या रा. मंगळवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बुद्धराज आणि अमरलाल हे फिरस्ते आहेत. मंगळवार पेठेतील पदपथावर ते राहायला आहेत.

पुणे रेल्वे स्थानकात प्रवासी तरुण रेल्वे डब्यात प्रवेश करत होता. त्या वेळी आरोपी बागडी यांनी तरुणाकडील मोबाइल संच लांबविला होता. याबाबत प्रवासी तरुणाच्या मित्राने लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांकडून मोबाइल चोरट्याचा शोध घेण्यात येत होता. बागडी यांनी रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांकडील मोबाइल संच हिसकावून नेल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली.

पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा लावला. पोलिसांना पाहताच दोघे जण पळाले. पाठलाग करून दोघांना पकडण्यात आले. आरोपी पदपथावर तात्पुरते छत बांधून राहत होते. पोलिसांनी तपासणी केली. बागडी यांच्याकडून २० मोबाइल संच जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मोबाइल संचाची किंमत एक लाख ९० हजार रुपये आहे.

लोहमार्ग पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अतिरिक्त अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय अधिकारी जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, उपनिरीक्षक यशवंत साळुंके, सुनील कदम, अनिल दांगट, नीलेश बिडकर, सिद्धार्थ वाघमारे, नेमाजी केंद्रे, छाया चव्हाण, मारटकर, तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक यादव, उपनिरीक्षक लाड, युवराज गायकवाड, विशाल माने, रसुल सय्यद यांनी ही कामगिरी केली.