पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर अनधिकृत पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना विक्री केल्या जात असल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. त्यानुसार रेल्वे पथकाने सुमारे एक हजार २८४ बाटल्यांचे १०७ अनधिकृत (परवाना नसलेल्या) ‘बाॅक्स’ ताब्यात घेतले असून, संबंधित विक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे.

मध्य रेल्वे विभागांतर्गत पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची दिवसेंदिवस गर्दी होत असून, अनधिकृत फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्टेशनला घेरले आहे. दैनंदिन २० ते २५ विक्रेत्यांवर रेल्वे सुरक्षा पोलीस बल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी रेल्वे स्थानकातील सुरक्षितता आणि सुविधांचा आढावा घेण्यासाठी रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सीलबंद पाण्याच्या बाटल्यांची विक्री करताना विक्रेते आढळून आले.

या विक्रेत्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता त्यांच्याकडे २८४ बाटल्यांचे १०७ अनधिकृत (परवाना नसलेल्या) बाॅक्स रेल्वे स्थानकातील गोदामाजवळ आढळून आले. या सर्व पाण्याच्या बाटल्या अनधिकृत असून, बेकायदेशीररित्या विक्री केली जात असल्याने संबंधित माल आणि विक्रेते यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती, पुणे रेल्वे जनसंपर्क विभागाचे अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दिली.

या प्रकारानंतर रेल्वे सामन्य पोलीस दलाच्या (जीआरपी) विभागाने धावत्या रेल्वेतील पाणी विक्रेत्यांची तपासणी केली. यावेळी रेवा एक्सप्रेसमध्ये ४० अनधिकृत कंपनीच्या बाटल्या सापडल्या. यावेळी विक्रेते सापडले नाही. तर जोधपूर एक्पप्रेसमध्ये अनधिकृत ब्रॅंंडच्या ७० बाटल्या सापडल्या असून यामध्ये जोधा यादव (रा. उत्तर प्रदेश) या विक्रेत्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रेत्यांकडून किंवा फेरीवाल्यांकडून अनधिकृत पाण्याच्या बाटल्या खरेदी न करता ‘रेल नीर’ पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या खरेदी कराव्यात. तसेच प्रवाशांनी खाद्यपदार्थ नेहमी रेल्वे स्थानकांवरील विक्रेते आणि अधिकृत दुकानांमधून खरेदी करावे. – अनिल कुमार पाठक, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे स्थानक.