विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात पुणे रेल्वेने राबविलेल्या मोहिमेत यंदा विक्रमी कामगिरी करण्यात आली. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १ लाख ७२ हजार ५७३ प्रवाशांना विनातिकीट पकडण्यात आले आहे, त्यांच्याकडून १२ कोटी ४ लाख ४७ हजार रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या आर्थिक वर्षातील दंड वसुलीचे १२ कोटींचे उद्दिष्ट पहिल्या सहा महिन्यांतच पूर्ण करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुणे : चांदणी चौकातील पूल मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान पाडला जाणार ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात पुणे रेल्वेकडून सातत्याने विशेष मोहिमा तसेच नियमित तिकीट तपासणीची कार्यवाही केली जाते. त्यात यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत विनातिकीट प्रवाशांकडून विक्रमी दंडवसुली करण्यात आली. सप्टेंबरमध्येही तब्बल २२ हजार १९४ फुकटे प्रवासी सापडले. त्यांच्याकडून १ कोटी ७० लाख रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. याशिवाय योग्य तिकीट न घेता प्रवास करणाऱ्या ४०५२ हजार प्रवाशांना पकडण्यात आले असून, त्यांना २३ लाख १२ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. जास्तीच्या सामानाचे तिकीट न घेता प्रवास करणाऱ्या ३०९ जणांना ३५ हजारांचा दंड आकारण्यात आला.

हेही वाचा >>> पुणे : राजपत्रित तांत्रिक सेवा २०२२ परीक्षेद्वारे ३७८ पदांची भरती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर विभागीय व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षकांद्वारे ही कारवाई करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि दंड न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे पुणे रेल्वेकडून सांगण्यात आले.