सागर कासार

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दैना झाली आहे. अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या आहेत. काहींची घरे पडली. तर काही कुटुंबातील माणसंच गेल्याने अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुसळधार पावसादरम्यान पुण्यातील सहकारनगरमधील अरण्येश्वर येथील टांगावाले कॉलनी परिसरात भिंत कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत जान्हवी जगन्नाथ सदावर आणि श्रीतेज जगन्नाथ सदावर या मायलेकांचाही मृत्यू झाला.

एकाच वेळी पत्नी आणि मुलाला गमावलेल्या या घटनेनं जगन्नाथ सदावर यांचा संसार मोडून पडला आहे. या घटनेनंतर जगन्नाथ सदावर यांनी बुधवारी रात्री ओढवलेल्या काळरात्रीचा प्रसंग ‘लोकसत्ता’ला सांगितला. जगन्नाथ सदावर म्हणाले की, “टांगावाले कॉलनी परिसरात चारही बाजूने रात्री 10 वाजण्याच्या पाणी शिरले. त्यामुळे मी, पत्नी जान्हवी आणि दोन मुलांसह नातेवाईकांकडे जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या आणि पत्नीच्या हातामध्ये दोन्ही मुलं होती. मुलाला घेऊन घराच्या बाहेर पडत असताना, पत्नीच्या आणि मुलाच्या अंगावर भिंत कोसळत असल्याचे दिसले. माझ्या हातातील बाळाला बाहेर असणार्‍या व्यक्तीकडे फेकले. त्यामुळे मी आणि माझा मुलगा वाचलो, पण पत्नीला आणि दुसऱ्या मुलास वाचू शकलो नाही. आम्ही लवकर बाहेर पडायला पाहिजे होतं,” असं सांगत असताना, त्यांना अश्रू अनावर झाले.

पुणे शहरात मंगळवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री रौद्रावतार धारण केला. सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. मदतकार्य मोहिमेदरम्यान एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाला आणखी सिंहगड परिसर आणि सहकार नगरात दोन मृतदेह सापडले होते. त्यानंतर मृतांचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात पावसामुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यु झाला आहे.