पुणे : रेल्वे प्रवासादरम्यान वेरावल-पुणे आणि अहमदाबाद-कोल्हापूर या गाड्यांमधील ४० लाख रुपयांचे सोने (११ तोळे) चोरीला गेल्याच्या प्रवाशांच्या दोन वेगवेगळ्या तक्रारी आल्यानंतर रेल्वे संरक्षण बल (आरपीएफ) आणि शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) यांनी तातडीने संयुक्त पथक स्थापन केले. तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि मुद्देमालासह चोरांना पकडले.
रविवारी, गाडी क्रमांक ११०८७ मधील एका महिलेचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली. तक्रारदार महिनेले तातडीने पुणे हद्दीत याबाबत पुणे रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली, तर गाडी क्रमांक ११०४९ कोल्हापूर एक्सप्रेस मिरज स्थानकावर असताना अशीच तक्रार प्राप्त झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेचे गांभीर्य ओळखून ‘जीआरपी’ आणि ‘आरपीएफ’ने तातडीने पुणे, शिवाजीनगर, लोणावळा आणि मिरज स्थानकांवर तपासाला सुरुवात केली. संयुक्त पथक स्थापन करून संबंधित स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रिकरण बारकाईने तपासले. एकमेकांना दृकश्राव्य माध्यमातून आणि दूरध्वनीवरून संपर्क साधून तपासाला गती देण्यात आली.
अखेर संशयित आरोपी संसी टोळीतील असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. त्यानुसार पथकाने वेगवेगळ्या दिशेने पोलीस कर्मचारी पाठवून संशयित टोळीच्या ठिकाणांवर जाऊन तपास सुरू केला. सोन्याचा ऐवज चोरणाऱ्यांपर्यंत तपासाचे पथक पोहोचले. खाक्या दाखवताच चोरीला गेलेले सोने संशयितांकडे आढळले. आरोपींनी कबुली दिल्याने आणखी किती ठिकाणी चोरी केली आहे किंवा नाही याबाबतचा अधिक तपास करण्यात येत आहे. चोरी गेलेला मुद्देमाल पुन्हा सापडल्याने तक्रारदारांचा जीव भांड्यात पडला.
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये संयुक्त कारवाई करून तपास पूर्ण करण्यात आला. चोरीच्या मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल मिळाला. प्रवाशांनी प्रवासादरम्यान आपले मौल्यवान सामान, विशेषत: सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू काळजीपूर्वक ठेवाव्यात. संशयास्पद हालचालींकडे लक्ष ठेवावे.- प्रियांका शर्मा, वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, पुणे विभाग