पुणे : आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ची (आठवले) शहर कार्यकारणी बुधवारी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्षपदी संजय सोनवणे यांची फेरनिवड करण्यात आली असून, ४६ उपाध्यक्ष, ३९ संघटक आणि १९ सचिवांचा समावेश असलेली शहर कार्यकारणी सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. महिपाल वाघमारे आणि शाम सदाफुले यांची सरचिटणीसपदी, तर वसंत बनसोडे आणि बसवराज गायकवाड यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी नगरसेविका हिमाली कांबळे, माजी अध्यक्ष बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, आसित गांगुर्डे, रोहिदास गायकवाड, महेंद्र कांबळे, अशोक कांबळे या वेळी उपस्थित होते.
दरम्यान, संघटनेच्या पुर्नबांधणीसाठी ‘रिपाइं’ची शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कोअर कमिटी’च्या बैठकीत नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आल्याचे सोनवणे यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाला अधिकाधिक जागा मिळवून देण्यासह संघटनेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ असेही सोनवणे म्हणाले.