पुणे: पन्नासहून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या एका चोरट्याला लोणावळा येथील घरफोडीच्या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांकडून साथीदारांसह अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे ३० लाखांचे ३५ तोळे सोने आणि दोन किलोग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा पोलीस स्थानकाच्या पथकांनी ही कामगिरी केली. चोरटा नुकताच चेन्नई येथील घरफोडीच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला होता.

चंद्रकांत अनंत माने उर्फ चंदू (वय ३२, रा. चाफेकरनगर, चिंचवडगांव) असे अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासह त्याचे साथीदार धनंजय हरीष काळे (वय २०, भारतनगर,चिंचवडगांव), दीपक शिवाजी मेंदगे (वय ३८, रा. कर्जत, जि. रायगड) आणि कैलासचंद्र धगनलाल जाट (वय ४०, रा. वाशी) यांनाही अटक करण्यात आली आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लोणवळा येथे एकट्याच राहतात. २५ मे रोजी त्या त्यांच्या मुलीकडे आंबेगाव बुद्रुक येथे गेल्या होत्या. ९ जून रोजी शेजाऱ्यांनी त्यांच्या घरात चोरी झाली असल्याचे त्यांना शेजाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर त्या मुलीसह लोणावळा येथे आल्या. त्यावेळी त्यांना घराचे कुलूप तोडले असल्याचे आढळले. त्यांच्या घरातून ४७ तोळे सोन्याचे दागिने, दोन किलोग्रॅम चांदीची भांडी असा २९ लाख २६ हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

पावसाळा सुरू झाल्यानंतर लोणावळा भागात चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात. भाडेतत्वावरील बंगले तसेच रहिवासी घरांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्याचा पोलिसांकडून समांतर तपास करण्यात आला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. घटना रात्रीच्या वेळी घडल्याचे तपासात उघडकीस आले. हे चोरटे घरफोडी करून लोणावळा रेल्वे स्थानक आणि तिथून पिंपरी-चिंचवडच्या दिशेने गेल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तपास केला. खबऱ्याकडून पोलिसांना घरफोडीसराईत चोरटा चंद्रकांत माने याने केल्याचे समजले. तसेच सध्या साथीदारासह वडगाव मावळ येथे असल्याची माहिती मिळाली.

वडगाव मावळ भागात जुना मुंबई पुणे महामार्गावर पावसात झाडाखाली साथीदार धनंजय काळे याच्यासह थांबलेल्या माने याला सापळा लावून पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याचे कबूल केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपासात त्याने दोन साथीदारांच्या मदतीने चोरलेल्या ऐवजाची विक्री केल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३४ तोळे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने, २ किलो चांदी असा ३० लाख एक हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

माने हा सराईत चोरटा असून त्याच्या विरुद्ध ५० हून आधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. तो चोरी करताना नेहमी वेगवेगळे साथीदार सोबत ठेवायचा. त्याच्याविरुद्ध कर्नाटक, चेन्नई, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर हद्दीत गुन्हे दाखल आहेत. १५ ते २० दिवसांपूर्वीच चेन्नई येथील घरफोडीच्या गुन्ह्यातून तो जमीनावर बाहेर आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजेश रामाघरे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, सहायक निरीक्षक राहूल लाड, उपनिरीक्षक रमेश भिसे, उपनिरीक्षक सुर्यकांत वाणी, पोलीस कर्मचारी राहुल पवार, सागर नामदास, धिरज जाधव, तुषार भोईटे, अमोल शेडगे, वैभव सावंत, समाधान नाईकनवरे, समीर तांगडे, उपनिरीक्षक मुकुंद कदम, अंमलदार संदिप मानकर, अविनाश जाधव, तुषार भोसले यांनी ही कामगिरी केली आहे.