पुणे : ‘मुलांची मानसिकता ध्यानात घेता प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच असले पाहिजे असे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले आहे. असे असताना पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा आग्रह का आणि त्याचे राजकारण हवे कशाला,’ असा सवाल ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी सोमवारी उपस्थित केला. ‘सर्वांचा आदर करण्याचे संस्कार झालेला मी मुक्त विचारांचा असून, सध्याचा भारतीय जनता पक्ष माझ्या परिचयाचा नाही,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.
‘इंडियन एक्सप्रेस’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ उपक्रमात सतीश आळेकर यांनी संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी मुक्त संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ‘माझे शिक्षण मराठी शाळेत झाले. मी शाळेत असताना हिंदी भाषा सहावीपासून, तर इंग्रजी भाषा आठवीत आली. नंतरच्या काळात इंग्रजी पाचवीपासून आली. हे ठीक सुरू असताना हिंदी पहिलीपासून हवी कशाला? खरे तर, इंग्रजी भाषादेखील पहिलीपासून नको होती. हा निर्णय आता मागे घेता येणार नसेल तर पहिलीपासून हिंदीचे ओझे मुलांवर लादणे योग्य होणार नाही. तिसऱ्या भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण हवे कशाला,’ असा परखड सवाल आळेकर यांनी उपस्थित केला.
‘मी मराठी शाळेत शिकत होतो, त्या काळातील काँग्रेस पुढाऱ्यांची मुले काॅन्व्हेंटमध्ये शिक्षण घेत होती,’ याकडे लक्ष वेधून आळेकर म्हणाले, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि अन्य धर्मीयांचा आदर करणारी या देशातील उदारमतवादी लोकशाही २०१४ पासून बदलली. अटलबिहारी वाजपेयी असतानाचा भाजप वेगळा होता. प्रमोद महाजन हे नाटकांचे चाहते होते. आताच्या मुखवटा बदललेल्या भाजपशी माझा संबंध नाही. सध्याच्या काळात तंत्रज्ञान आणि पैशांचा वापर वाढला असला, तरी वैचारिक पातळीवरचे दारिद्र्य कसे दूर करणार, हा खरा प्रश्न आहे.’
‘माझ्या नाटकांना प्रेक्षक मिळणे अवघड होते. त्यामुळेच ५० वर्षे झाली, तरी नाटकांचे प्रयोग मर्यादित झाले. पण, पूर्वीचे प्रेक्षक परिपक्व होते. आपल्याला कोणते नाटक पाहायचे याची त्यांना पूर्ण कल्पना असायची. आता नाटकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांची वाढलेली संख्या ध्यानात घेतली, तर ही सूज म्हणावी का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे,’ याकडे आळेकर यांनी लक्ष वेधले.
पुरुषप्रधान नाट्यसृष्टीमध्ये विजया मेहता, सई परांजपे, प्रतिमा कुलकर्णी यांनी आपला ठसा उमटविला आहे. नंतरच्या पिढीमध्ये पर्ण पेठे, इरावती कर्णिक, मनस्विनी लता रवींद्र, मुक्ता बाम, शिल्पा कांबळे या चांगले काम करीत आहेत. सध्या रंगभूमीवर गाजत असलेली ‘असेन मी नसेन मी’, ‘चारचौघी’, ‘संगीत देवबाभळी’, ‘करुणाष्टक’ ही नाटके तर स्त्रीप्रधान आहेत. – सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार