पुणे : मोसमी वाऱ्यांनी १९६२ नंतर प्रथमच २९ मेपूर्वी पुण्यात दाखल होत नवा विक्रम सोमवारी नोंदवला. त्यानंतर मंगळवारी शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसही मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर शुक्रवारपासून (३० मे) पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सुमारे १० ते १५ दिवस लवकर मोसमी वारे पुण्यात दाखल झाले. त्यापूर्वीही काही दिवस सातत्याने शहर आणि परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर सोमवारीही शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडला. मात्र, मंगळवारी पावसाची तीव्रता थोडी कमी झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणेनऊपर्यंत शिवाजीनगर येथे १५.७, लोहगाव येथे २३.२, चिंचवड येथे २९, मगरपट्टा येथे १८, कोरेगाव पार्क येथे ५, तर एनडीए येथे २४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
पुढील तीन दिवसांत घाट परिसरात मुसळधार, तर शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शुक्रवारपासून (३० मे) आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.