पुणे : रस्त्यावर थांबलेल्या डंपरवर शिवशाही बस आदळून चालकासह वाहक, तसेच दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी भागात घडली. डंपर रस्त्याच्या कडेला थांबवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दीपक प्रकाश माने (वय ४९, रा. गुंडेवाडी, मिरज, जि. सांगली) असे जखमी चालकाचे नाव आहे. याबाबत माने यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज ते स्वारगेट या मार्गावरील शिवशाही बस मंगळवारी (१७ जून) दुपारी एकच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरून स्वारगेट स्थानकाकडे निघाली होती. शंकरमहाराज मठासमोर डंपरचालकाने बेशिस्तपणे रस्त्याच्या कडेला डंपर थांबविला. त्या वेळी पाठीमागून शिवशाही बस डंपरवर आदळली. अपघातात बसचालक माने यांच्यासह वाहक, दोन प्रवासी जखमी झाले. अपघातात बसचे नुकसान झाले.
माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. हवालदार कांबळे तपास करत आहेत.