पुणे : शहर आणि उपनगरांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा, यासाठी वाहतूक पोलिस आणि महानगरपालिकेकडून ‘स्मार्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’चा अवलंब करण्यात येत आहे. त्यानुसार शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि परिसरात ‘सर्व्हेलन्स व्हॅन’द्वारे सर्वेक्षण करण्यात येत असून, त्यातून निदर्शनास आलेल्या समस्यांवर उपाययोजना म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यास सुरुवात झाली आहे.
वाहतूक पोलिस, महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ‘एनआयबीएम’ परिसरात बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी शंभराहून अधिक ‘एआय’वर आधारित ‘सीसीटीव्ही’ बसविण्यात आले आहेत.
वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या ठिकाणांवर वाहतूक पोलिस आणि महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. चुकीच्या ठिकाणी वाहने उभी करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, सिग्नल तोडण्यासह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी प्रामुख्याने एआय आधारित वाहतूक नियंत्रण प्रणालीच्या आधारे नियोजन होत आहे. वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी ‘डायनॅमिक रिस्पॉन्स सिस्टीम’, अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’, वाहतूक नियंत्रित दिव्यांची स्वयंचलित प्रणाली आदींचे नियोजन करण्यात येत आहे.
शहरातून जाणाऱ्या जिल्हा आणि राज्य महामार्गांवर वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः अहिल्यानगरकडे जाताना येरवडा ते वाघोली, सोलापूर रस्त्यावर हडपसर, उरळीकांचन, फुरसुंगी, खराडी, मगरपट्टा, मुंबई बंगळुरू महामार्गावरील कात्रज, कोंढवा, चांदणी चौक, कोथरूड, आनंदऋषीजी चौक, बाणेर, पाषाण या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
प्रामुख्याने अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाटी अधिक सुसंगत, सुरक्षित व गतिमान वाहतुकीसाठी एआय आधारित सीसीटीव्ही यंत्रणा या मार्गावर कार्यान्वित करावी अशी मागणी वाको वेलफेअर असोसिएशनचे (टीम वाको) अध्यक्ष अनिलकुमार मिश्रा यांनी केली.
एआय सीसीटीव्हीचे फायदे
- वाहतूक नियंत्रण करून बेशिस्त वाहनधारकांवर स्वयंचलित कारवाई
- संकलित माहितीच्या आधारावर विश्लेषण आणि धोरणे, सुधारणा दीर्घकालीन उपाय
- वाहतूक कोंडी, अपघात समस्यांतून सुटका
- प्रदूषण समस्येतून सुटका आणि सुलभ प्रवास
- पादचारी, वाहनधारकांची सुरक्षितता सुनिश्चित
शहरातील वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहतूक, अपघात यांसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘स्मार्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’चा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रमुख परिसरात, महामार्गांच्या ठिकाणी एआय आधारित सीसीटीव्ही यंत्रणांच्या माध्यमातून देखरेख ठेवता येणार आहे. तसेच, प्राप्त माहितीनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजाणीही करण्यात येईल. – हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर