पुणे : विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. सुरेश असे अटक करण्यात आलेल्या शिकवणी चालकाचे नाव आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी सुरेश याच्याकडे शिकवणीला यायची. स्वारगेट भागात आरोपी खासगी शिकवणी चालवितो. गुरुवारी (९ ऑक्टोबर) सकाळी पावणेआठच्या सुमारास मुलगी शिकवणी वर्गात एकटीच होती. त्या वेळी आरोपीने मुलीशी संवाद साधला. ‘तू शिकवणी वर्गात प्रवेश घेतल्यापासून मला आवडते. मी शाळा सुरू करणार आहे. तू शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी तुला शाळेत नोकरी देणार आहे, तसेच तुला मी सोन्याची रिंग देणार आहे’, असे सांगून त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने याबबातची माहिती कुटुंबीयांना दिली. या घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून, उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
युवतीला धमकाविणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा
महाविद्यालयीन युवतीला धमकाविणाऱ्या एकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका अल्पवयीन युवतीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका १७ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक आणि युवती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपीने युवतीशी ओळख केली. दोघांमध्ये मैत्री झाली. दोघे समाज माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर युवकाच्या त्रासामुळे युवतीने त्याच्याशी असलेले संबंध तोडले. गेल्या आठ महिन्यांपासून युवक तिला त्रास देत होता. तिचा पाठलाग करायचा. महाविद्यालयात जाऊन त्याने तिला धमकाविण्यास सुरुवात केली. आरोपीच्या त्रासामुळे तिने सहकारनगर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.
तरुणीला धमकावून बलात्कार प्रकरणी एकाला अटक
तरुणीला धमकावून बलात्कार केल्या प्रकरणी एकाला वाघोली पोलिसांनी अटक केली. रवी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख झाली होती. आरोपीने तिला जाळ्यात ओढले. तरुणीला धमकावून त्यांना बलात्कार केला. पोलीस उपनिरीक्षक राघो तपास करत आहेत.
दरम्यान, विवाहाच्या आमिषाने एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी तरुणाविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.