विसर्जन मिरवणुकीत टिळक रस्त्याने सहभागी झालेल्या भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या मंडळाने टिळक चौकात ध्वनिवर्धकावरुन गाणी वाजविण्याचा हट्ट धरल्याने मिरवणूक रेंगाळली. दोन तास मंडळाचा रथ एकाच जागेवर रेंगाळल्याने अखेर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा पारा चढला आणि आग्रह धरणाऱ्या पोटे यांच्या नवनाथ मंडळाची मिरवणूक मार्गस्थ झाली.
हेही वाचा >>> लोणावळ्यात पारंपरिक उत्साहात विसर्जन मिरवणूक ; मिरवणुकीत पावसाची हजेरी
नवी पेठेतील नवनाथ मित्र मंडळाचा रथ टिळक चौकात दोन तास एकाच जागी थांबून होता. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या मंडळांना वाट उपलब्ध झाली नव्हती. एकाच जागेवर दोन तास रथ थांबल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी तेथे गेले. मंडळाने मार्गस्थ व्हावे, अशी विनंती करण्यात आली. मात्र, मंडळ जागेवर थांबून राहिल्याने पोलीस आयुक्तांचा पारा चढला. सूचना देऊनही मंडळाचा रथ जागेवरुन पुढे जात नसल्याने पोलीस आयुक्त गुप्ता रथावर गेले आणि त्यांनी ध्वनिवर्धक यंत्रणा बंद करण्याचा आदेश दिला. माजी नगरसेवक दीपक पोटे पु्न्हा रथावर गेले. त्यांनी ध्वनिवर्धक यंत्रणा सुरू करण्यास सांगितले.
हेही वाचा >>> पुणे : अनंत चतुर्थीदिवशी ३ लाखाहून अधिक मूर्तींचे विसर्जन ; ४ लाख ४३ हजार किलो निर्माल्याचे संकलन
हे पाहताच पोलीस आयुक्त गुप्ता भडकले. कार्यकर्ते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरीत मध्यस्थी केल्याने वाद निवळला. दरम्यान, या घटनेची ध्वनीचित्रफित प्रसारित झाल्याने चर्चेचा विषय ठरली.