पुणे : कोथरूड भागातील एका बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार कोथरूड पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड भागातील सोलारिस क्लबजवळ श्रीनिकेतन सोसायटीत तक्रारदारांचा बंगला आहे. चोरटे शुक्रवारी मध्यरात्री सीमाभिंतीवरून उडी मारून बंगल्यात शिरले. चोरट्यांनी कटरचा वापर करून बंगल्यातील चंदनाचे झाड चोरून नेले. बंगल्याच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत. शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चंदन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वी चोरट्यांनी प्रभात रस्ता, तसेच डेक्कन जिमखाना भागातील एका बंगल्यातून चंदनाचे झाड चोरून नेले होते. शासकीय कार्यालये, तसेच शैक्षणिक संस्थांच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.