पुणे : शहराचा वाढता विस्तार, तसेच गंभीर गुन्हे विचारात घेऊन शहरात आणखी पाच नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. नवीन पोलीस ठाण्यांची हद्द निश्चित झाली असून, याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. लोहगाव, नऱ्हे, मांजरी, लक्ष्मीनगर (येरवडा), येवलेवाडी (उंड्री) अशा पाच नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. शहर पोलीस दलात आणखी सात पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदे निर्मितीचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे.
वर्षभरापूर्वी शहरात सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली होती. नवीन पोलीस ठाणी, चौक्यांमुळे पोलीस दलाचे कामकाज सक्षम होणार आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यास मदत होणार आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
शहराचा विस्तार वाढत आहे, तसेच गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. शहरातील नवीन पोलीस ठाण्यांसह अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासणार आहे. पुणे पोलीस दलात पोलीस उपायुक्त दर्जाच्या सात अधिकाऱ्यांची पदे मंजूर करण्याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मंजुरी दिली आहे. वाहतूक शाखेत आणखी दोन पोलीस उपायुक्त, पोलीस मुख्यालयात दोन उपायुक्त, सायबर गु्न्हे शाखेत दाेन उपायुक्त, तसेच विशेष शाखेत एक उपायुक्त नेमण्यात येणार आहे.
पुणे पोलीस दलात सात परिमंडळे
पुणे पोलीस दलात सध्या पाच परिमंडळे आहेत. पोलीस दलाचे कामकाज गतिमान करणे, तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सध्या असलेल्या पाच परिमंडळांचे विभाजन करून सात परिमंडळांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. संबंधित प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
- नवीन पोलीस ठाण्यांमुळे कामकाज गतिमान
- तक्रारदारांना त्वरित मदत उपलब्ध
- गुन्हेगारांवर वचक
- कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत
नवीन ३० चौक्या प्रस्तावित
नवीन पाच पोलीस ठाण्यांसह नागरिकांच्या मदतीसाठी स्थानिक भागात ३० नवीन पोलीस चौक्या प्रस्तावित आहेत. एखादी गंभीर घटना घडल्यानंतर तक्रारदार पहिल्यांदा पोलीस चौकीत जातो. त्यामुळे अतिरिक्त पोलीस चौक्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती कशी?
- विमानतळ पोलीस ठाण्यातून लोहगाव पोलीस ठाणे</li>
- नांदेड सिटी पोलीस ठाण्यातून नऱ्हे पोलीस ठाणे
- हडपसर पोलीस ठाण्यातून मांजरी पोलीस ठाणे
- येरवडा पोलीस ठाण्यातून लक्ष्मीनगर पोलीस ठाणे
- कोंढवा पोलीस ठाण्यातून येवलेवाडी पोलीस ठाणे