विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याला आयआयटी, आयआयएम, एम्स अशा प्रमुख केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्था आजवर मिळाल्या नाहीत. त्यासाठी अनेकदा मागण्याही करण्यात आल्या होत्या. मात्र, पुणे आणि परिसरात आता आयआयएमची उपकेंद्रे येऊ घातली आहेत. व्यवस्थापनशास्त्र पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सुमारे शंभर संस्था पुणे शहर आणि जिल्ह्यात असताना आता येऊ घातलेल्या आयआयएमच्या केंद्रांमुळे नेमके काय साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक शिक्षण संस्थांद्वारे व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रम राबवण्यात येतात. त्याशिवाय अनेक खासगी विद्यापीठांचेही व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रम आहेत. त्यातील काही संस्था, त्यांचे अभ्यासक्रम नावाजलेलेही आहेत. त्यामुळे व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांची आधीच गर्दी झालेली असताना, त्यात आता आयआयएमची भर पडणार आहे. मात्र, अनेक वर्षे मागणी असताना पुण्याला स्वतंत्र आयआयएम न मिळता आता उपकेंद्रे मिळणार आहेत.
आयआयएम नागपूरचे मोशी येथे उपकेंद्र होऊ घातले आहे. त्यासाठी राज्य सरकारने ७० एकर जागा मंजूर केली आहे. आयआयएम नागपूरचे अभ्यासक्रम गेल्या काही वर्षांपासून पुण्यात राबवण्यात येतात. आता स्वतंत्र जागेत उभारल्या जाणाऱ्या उपकेंद्राचे काम पुढील दोन वर्षांत होणे अपेक्षित आहे. त्याशिवाय नुकतेच केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आयआयएम मुंबईचे पुण्यात उपकेंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची घोषणा केली. आयआयएम मुंबईचे पुण्यात उपकेंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मोहोळ यांनीच दिला होता. मात्र, आयआयएम मुंबईचे पुण्यातील उपकेंद्र नेमके कुठे सुरू होणार याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही.
पुणे आणि परिसरात गेल्या काही वर्षांत व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रम अनेक संस्थांनी सुरू केले आहेत. किमान शंभर संस्थांमध्ये व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रम आहेत. त्यामुळे नियमित विद्यार्थ्यांच्या पलीकडे जाऊन आयआयएमचा मुख्य उद्देश नोकरदारांसाठीचे अभ्यासक्रम आहे. ज्यातून कार्यरत नोकरदारांमध्ये नवी कौशल्ये विकसित होतात. त्या अनुषंगाने येऊ घातलेल्या उपकेंद्रांच्या माध्यमातून कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर कार्यरत नोकरदारांसाठीचे अभ्यासक्रम राबवल्यास त्याचा शहराला काही प्रमाणात उपयोग होऊ शकतो, असा व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वास्तविक पुण्याला यापूर्वीच स्वतंत्र आयआयएम किंवा आयआयटी मिळणे अपेक्षित होते. ते मिळालेले नाही. आयआयएम आता देशभरात अनेक ठिकाणी झाल्या आहेत. त्यामुळे आयआयएमचे उपकेंद्र आणले, या राजकीय आकांक्षांपलीकडे शहराच्या दृष्टीने फारसे काही हाती लागणार नाही, असे एका ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञाने सांगितले.
ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांच्या मतानुसार, आयआयएमची निवड प्रक्रिया अत्यंत अवघड असते. त्यात पुण्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. आयआयएमचे शुल्कही परवडणारे राहिलेले नाही. येऊ घातलेल्या उपकेंद्रांमध्ये पुण्याबाहेरचेच जास्त लोक येऊन शिकतील. त्यामुळे पुण्याला तसा काही फायदा होणार नाही. तर, करिअर मार्गदर्शक डॉ. भूषण केळकर यांनी डॉ. गीत यांच्यापेक्षा वेगळे मत नोंदवले. ‘आयआयएमला मोठा दर्जा आहे, आयआयएमचे नाव जागतिक पातळीवर आहे. भले पुण्यात उपकेंद्र होणार असले, तरी त्याचे महत्त्व आहे. पुण्यात होऊ घातलेले उपकेंद्र उत्तम पद्धतीने चालल्यास भविष्यात त्यांचे स्वतंत्र संस्थेत रूपांतर होऊ शकते,’ असे त्यांनी सांगितले.
एकूणात, आयआयएमच्या उपकेंद्रांच्या पुण्यासाठी उपयोगितेच्या दृष्टीने तज्ज्ञांमध्ये साधकबाधक मत असल्याचे दिसून येते. मात्र, आजवर पुण्याला आयआयएम मिळाले नसल्याची सलही व्यक्त होत आहे.
chinmay.patankar@expressindia.com
