पुणे : पूरक स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील काही दिवस पावसाचे असण्याची शक्यता आहे. येत्या २० ऑगस्टपर्यंत पुण्यासह राज्यभर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
पावसाच्या पुनरागमनासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. हवेच्या कमी दाब क्षेत्राचा आस त्याच्या सरासरीच्या जागेपासून दक्षिणेकडे सरकला आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीदरम्यान ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत अस्तित्वात असलेले गोलाकार हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचे वायव्येकडे मार्गक्रमण होण्याची शक्यता आहे. तसेच, अरबी समुद्रात ३.१ किलोमीटर उंचीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती दिसून येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोरसह मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अधिक जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांत पुणे शहरात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस असल्याचे दिसून येते. पुण्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी १२८ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत कमी पाऊस नोंदवला गेला आहे. आता २० ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाच्या अंदाजामुळे पावसाची आकडेवारी वाढू शकते.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आतापर्यंत चांगला पाऊस नोंदवला गेला आहे. ताम्हिणी येथे सर्वाधिक ६ हजार २४८ मिलीमीटर, लोणावळा येथे ३ हजार ३९८, मुळशी येथे २ हजार ७६१ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे.
पाऊस कोठे, किती?
- राज्यभरात मध्यम ते जोरदार
- पुणे शहरात मध्यम
- पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावरील जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर येथे जोरदार
पाऊस कशामुळे?
- हवेच्या कमी दाब क्षेत्राचा आस सरासरीच्या जागेपासून दक्षिणेकडे
- बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीदरम्यान ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत गोलाकार हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र
- या क्षेत्राचे वायव्येकडे मार्गक्रमण होण्याची शक्यता
- अरबी समुद्रात ३.१ किलोमीटर उंचीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती
घाटमाथ्यावरील स्थिती काय?
- जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आतापर्यंत चांगला पाऊस
- ताम्हिणी येथे सर्वाधिक ६ हजार २४८ मिलीमीटर
- लोणावळा येथे ३ हजार ३९८ मिलीमीटर
- मुळशी येथे २ हजार ७६१ मिलीमीटर