पुणे : विवाहाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याने दोन तरुणींनी आत्महत्या केल्याच्या घटना हडपसर आणि वाघोली येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. विवाहाच्या आमिषाने फसवणूक केल्याने एका १७ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात घडली. युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका १७ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत युवतीच्या आईने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी युवक एका महाविद्यालयात अकरावीत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील फुरसुंगी भागात युवती राहायला आहे. युवतीच्या घराशेजारी आरोपी युवक राहायला आहे. युवकाने तिच्याशी ओळख वाढवून प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिला विवाहाचे आमिष दाखविले.
दरम्यान, युवती वेगळ्या जातीतील असल्याने युवकाने आपल्या विवाहाला कुटुंबीय मान्यता देणार नाहीत. तू दुसऱ्या जातीतील आहे, असे सांगितले. तेव्हापासून युवती नैराश्यात होती. २३ मे रोजी युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
विवाहाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याने एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली परिसरात घडली. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अमित परमार (वय २६, रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवानीचा भाऊ चंद्रशेखर सिंग (वय ३२, रा. जबलपूर, मध्य प्रदेश) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करत आहेत.