पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आता विद्यार्थ्यांचे अपार (ऑटोमेटेड पर्मनंट ॲकॅडेमिक रेजिस्ट्री) आयडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या अपार आयडीद्वारे विद्यार्थ्यांना विशेष क्रमांक मिळणार असून, विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास त्यात साठवला जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या माहितीची सुरक्षितता, अपार आयडी काढण्यास नकार देणे, शिक्षकांना करावे लागणारे अतिरिक्त काम या बाबतीत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांनी विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारने १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याच्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण, विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड नोंदणीतील अडचणी संपलेल्या नसताना आता अपार आयडी तयार करण्याचे कामही शिक्षकांवरच पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार

केंद्रीय शालेय शिक्षण सचिव संजय कुमार यांच्या पत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार अपार आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल पद्धतीने साठवण्यात येणार आहे. ही माहिती हवी तेव्हा ऑनलाइन उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर देखरेख करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकावरूनच पालकांच्या संमतीने अपार आयडी तयार केला जाणार आहे. त्यासाठी संमतीपत्र भरून द्यावे लागणार आहे. अपार आयडीमध्ये साठवली जाणारी माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करता प्रत्येक विद्यार्थ्यांकडे एक स्वतंत्र युनिक आयडी असणे गरजेचे आहे. त्यात अध्ययन निष्पत्ती, परीक्षांचा निकाल, समग्र अहवाल, विद्यार्थ्याने शैक्षणिक उपक्रमात केलेली कामगिरी, क्रीडा, कौशल्य प्रशिक्षण अशी सर्वंकष माहिती असेल.

हेही वाचा : जेजुरीच्या खंडोबा गडावर घटस्थापना, उत्सवमूर्ती गाभाऱ्यात

“आधार क्रमांक, स्टुडंट आयडी हे युनिकच क्रमांक आहेत. आता नव्याने अपार क्रमांकाची गरज काय, आधार आणि स्टुडंट आयडीचा विदा अधिकृत असताना तो अनधिकृत ठरणार का, असे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाचा घोळ अद्याप संपलेला नाही. त्याचे शिक्षकांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्यात आता अपारची भर पडणार आहे. ही कामे शिक्षकांवरच का लादली जातात? शिकवणे सोडून अशैक्षणिक कामांनी शिक्षक बेजार झाले आहेत, अपुऱ्या शिक्षक संख्येकडून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा ठेवली जात आहे”, असे मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ अमेरिकेची अयोग्य कॉपी; ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आशुतोष कोतवाल यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“‘अपार’ हे आधार संलग्न असणार आहे. त्यामुळे आधारची सक्ती केली जाईल. आधारची सक्ती करता येणार नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे आधारसक्तीमुळे या निर्णयाचे उल्लंघन होते. ‘अपार’साठी पालकांची संमती घेतली जाणार असली, तरी नकार देण्याची मुभा असल्याचे पालकांना सांगितले गेले पाहिजे. त्याशिवाय इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली जाणार असल्याने विदा सुरक्षेचा प्रश्नही आहेच”, असे मत शिक्षण अभ्यासक किशोर दरक यांनी व्यक्त केले.