मोसमी पाऊस सक्रीय झाल्यापासून मंगळवारपर्यंत शहरासह जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. आतापर्यंत तब्बल १०७.४ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यातील घाटरस्त्यांवर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, तर काही ठिकाणी घाटरस्त्यांवरील धोकादायक परिस्थिती पाहता रस्ते बंद करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा लाल इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण आणि मदत कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज –

शहरासह ग्रामीण भागात तसेच घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आठवडाभरापूर्वी तळ गाठलेले खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून देखील मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर स्थानिक महानगरपालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) सुदंबरन येथील तुकडी सज्ज करण्यात आली आहे. दरम्यान या तुकडीसाठी मदतीसाठी असणाऱ्या बोटी, दोरखंड, वाहने आणि इतर साहित्यासोबत अतिरिक्त एक बस, इनोव्हा आणि एक ट्रक अशी तीन वाहने देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी सांगितले.

पुणे : खडकवासला धरणातून १० हजार क्युसेकने विसर्ग; धरणक्षेत्रात पाऊस कायम

दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील १३ तालुक्यात मंगळवारी ६८०.९३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून सरासरी ४८.६४ टक्के पाऊस झाला आहे.

दरड कोसळण्याच्या शक्यतेने पुणे-महाड रस्ता बंद –

खेड तालुक्यात धुवोली ते शिरगाव दरम्यान दरड कोसळल्यामुळे वाडे ते भोरगिरी भीमाशंकर हा रस्ता बंद झाला आहे. जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, तर पुणे – भोर – महाड महामार्गादरम्यान असणाऱ्या वरंध घाटात दरड कोसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला असून पुणे – पिरंगुट- मुळशी – ताम्हिणी घाट – निजामपूर – माणगाव – महाड अशा पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मावळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस –

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मावळ तालुक्यात सर्वाधिक १३८.५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मावळ तालुक्यातल बहुतांश ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने संबंधित ठिकाणच्या स्थानिकांना पावसाळ्यापूर्वीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, तर इंदापूर तालुक्यात काल दिवसभरात सर्वात कमी म्हणजे अवघ्या २.६३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका आणि पाऊस मि.मी मध्ये –

पुणे शहर  –       ३१.५०

हवेली     –       २६.८०

मुळशी    –      १२४.००

भोर        –     ६९.१३

मावळ    –      १३८.५७

वेल्हा.   –     १००.००

जुन्नर    –        ६१.८९

खेड      –      ५६.७८

आंबेगाव    –    ४०.४०

शिरूर     –     १०.९९

बारामती   –     ६.१३

इंदापूर     –     २.६३

दौंड    –         ५.१३

पुरंदर    –        ७.००