पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात पावसाचा जोर किंचित वाढला. सध्या धरणांमधील पाणीसाठा २०.४८ अब्ज घनफूट (टीएमसी) ७०.२६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ४४ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात २३ मि.मी, पानशेत धरण परिसरात २२ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात अवघा एक मि.मी. पाऊस पडला. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात २०.४८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. शनिवारी रात्री चारही धरणांत २०.२६ टीएमसी पाणीसाठा होता. शनिवारी रात्रीच्या तुलनेत रविवारी सकाळी ०.२२ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

 दरम्यान, खडकवासला धरणातून तूर्त पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. आतापर्यंत या धरणातून ३.३४ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सध्या नवीन मुठा कालव्यातून १००५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत –

टेमघर                   २.१३      ५७.५९
वरसगाव               ८.६८     ६७.६९
पानशेत                 ७.८१      ७३.३६
खडकवासला        १.८६      ९४.०८
एकूण                   २०.४८    ७०.२६