पुणे : समाज माध्यमातील विवाह विषयक संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. समाज माध्यमात छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेकडून दोन लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी एकाविरुद्ध खराडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सोलापूर जिल्ह्यातील पारगाव परिसरात राहायला आहे. याबाबत एका महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपीची गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विवाह विषयक संकेतस्थळावरुन ओळख झाली होती. आरोपीने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर तो महिलेला भेटण्यासाठी पुण्यात आला. एका हाॅटेलमध्ये महिलेला नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला, तसेच तिची छायाचित्रे त्याने मोबाइलवर काढली. त्यानंतर आरोपीने महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. हाॅटेलमध्ये काढलेली छायाचित्रे महिलेचे नातेवाईक आणि समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून दोन लाख रुपये उकळले.

महिलेने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने विवाहाबाबत विचारणा केल्यास विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने नुकतीच खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बलात्कार, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक मोनाली भदे तपास करत आहेत.

विवाहाच्या आमिषाने महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. विवाह विषयक संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन महिलांकडून पैसे उकळण्याचे, तसेच अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.