डॉ. अनंत सरदेशमुख

Loksatta Pune Vardhapan 2023 : माणसाची जनुके, डीएनए पासून बनतात असे शास्त्र सांगते. जनुके ही डीएनएचे भाग असतात व ती माणसाच्या शारीरिक गुणधर्म ,वैशिष्ट्याला कारणीभूत ठरतात. हीच जनुके माणसाला एक विशिष्ट ओळख देतात. डीएनए मध्ये जीवसृष्टीचा विकास, जगण्यासाठी आणि पुनरुत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सूचना असतात. ही कार्ये पार पाडण्यासाठी, तुमची मानवी रचना तयार करण्यासाठी आणि देखरेखीसाठी डीएनए जबाबदार आहे.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

पुण्याचेसुद्धा एक गावमत्व (व्यक्तिमत्त्व) आहे. शहराची काही वैशिष्टये,ओळख नक्कीच आहे आणि ती देणारी डी.एन.ए. किंवा जनुके काय, असा जर कुणाला प्रश्न पडला तर मला वाटते ती जनुके, डी.एन.ए.शोधण्यासाठी या शहराचा इतिहास, घडण पाहणे जरुरी आहे.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : दिशा देणारे संशोधन

शहरांची विशिष्ट ओळख मुख्यतः तेथील माणसे ठरवतात. पुणे एक ऐतिहासिक शहर, अगदी परदेशी मुसलमानी सत्ता उधळून लावून तिच्याशी कट्टर लढत देणारे शिवाजी महाराज असोत किंवा पार मराठ्यांचा झेंडा अटकेपार आपल्या तलवारी पाजळत घेऊन जाणारे बाजीराव व इतर पेशवे असोत; शौर्य,साहस,बुद्धिमत्ता,कष्ट ही त्यांना देणारी जनुके, त्यांचा डी. एन. ए. हा पिढ्यान पिढ्यातून या शहरातील लोकात विकसित झाला. पुण्याची शौर्य,वीरता,साहस ही वैशिष्ट्ये नेहमीच दिसून आली आणि सर्वच क्षेत्रात दिसून येत आहेत.

इतिहास असेही सांगतो, की कावसजी नांवाच्या एका ब्रिटिशांच्या सैन्यातील बैलगाडी चालकाचे नाक व एक हात प्रसिद्ध १७९२ च्या तिसऱ्या इंग्रज म्हैसूर लढाईत टिपू सुलतानने कापले. कावसजी हा मराठा युद्धानंतर पुण्यात पोहोचला आणि त्याचे तुटलेले नाक पुण्यातील वीटभट्टीवरील एका माणसाने शस्त्रक्रिया करून,म्हणजेच चक्क एका बैलाचे कातडे कावसजीच्या नाकावर रोपण करून नीट करून दिले.ही आधुनिक युगातील प्लास्टिक शस्त्रक्रियेची सुरुवात होती असा ‘जंटलमन’ मासिकाच्या ऑक्टोबर १७९४ च्या प्रसिद्ध झालेल्या अंकात, संपादकाला आलेल्या पत्रात उल्लेख आहे. तेंव्हा पुण्यात नवनिर्माण म्हणजे ईनोव्हेशनचा डी. एन. ए. अडीच शतकांपासूनच आहे हे सुद्धा दिसून येते. १९०८ साली ईश्वरदास वर्ष्णेई ह्या अमेरिकेतील एम. आय. टी. ह्या प्रसिद्ध तंत्रज्ञान महाविद्यालयात रसायन अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या अभियंत्याने,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व अंताजी दामोदर काळे ह्यांच्या सहकार्याने तळेगाव चाकण रस्त्यावर पैसा फंड काच कारखाना सुरू केला. याचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या कारखान्याचे पूर्ण भांडवल लोकांनी प्रत्येकी १ पैसा फंड देऊन जमा केले होते. म्हणजेच सध्या ज्याला आपण क्राऊड फंडिंग म्हणतो ते पुण्यात लोकमान्यांच्या कल्पनेतून जन्मले! परकीय प्रगत तंत्रज्ञान जगातील उत्कृष्ट संस्थेतून पुण्यात आणून त्याची रुजवात पुण्यात करण्याची तसेच प्रकल्प उभारणीसाठी नवपद्धती वापरण्याचे गुण ज्यातून आले ती जनुके विसाव्या शतकातही पुण्यात दिसून येतात.

पुण्याच्या औद्योगिकीकरणाची सुरूवात दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास झाली व पुणे परिसरात या काळात दारूगोळा कारखाने ब्रिटिशांनी प्रस्थापित केले. त्यानंतर किर्लोस्कर उद्योग समूहाने आपल्या पंपाच्या उद्योगाला इथे सुरुवात केली व पुण्याच्या औद्योगिकीकरणाची बीजे पेरली. १९४० च्या मध्यास किर्लोस्कर समूहाने असोसिएटेड ब्रिटिश ऑईल इंजिन्स एक्स्पोर्ट हया ब्रिटिश कंपनीशी व्यापारी करार केला व हीच यांत्रिकी सहयोग उद्योगाची पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील सुरुवात होती. पुणे किंवा किंबहुना महाराष्ट्राला उद्योग ,कारखानदारीकडे नेणारे व ह्या क्षेत्राला नेतृत्व देणारे,किर्लोस्कर ,वालचंद ,बजाज,फिरोदिया,टाटा, कल्याणी ,छाब्रिया , पवार इत्यादी कुटुंबांनी ह्या क्षेत्राच्या औद्योगिकच नाही तर एकंदरच विकासाची मुहूर्तमेढ जशी केली तशी उद्योजकतेची सुद्धा. हे सर्वच उद्योग पुण्याला सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योगाचे केंद्र बनवण्याचे श्रेय नक्कीच घेवू शकतात. याच उद्योगात कामाचा अनुभव घेऊन अनेक प्रशिक्षित लोक उद्योजक बनले.पुण्याची उद्योजकतेची जनुके चांगलीच पसरली. पुण्यात देशातील दुसरे इंजिनिअरिंग कॉलेज १८५४ साली चालू झाले. नंतर खासगी इंजिनिअरिंग कॉलेजना मान्यता देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य बनले. पुण्यात अनेक चांगली खासगी इंजिनिअरिंग कॉलेज स्थापित झाली आणि या सारख्या अनेक चांगल्या दर्जाच्या तांत्रिक संस्थांनी चांगले तंत्रज्ञ व तांत्रिक विषयातील मनुष्यबळ पुण्याला नेहमीच पुरवले आणि त्यातील अनेक उद्योजक बनले.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : नव्या पुण्यासाठी द्रष्टे सुनियोजन व अंमलबजावणीची गरज…

पुणे हे त्याच्या उत्कृष्ट हवामान, शिक्षण,नागरी सुविधा,कुशल मनुष्यबळ याने परदेशी गुंतवणूकदारांचे आकर्षण बनले आणि त्यामुळेच जगातील जवळजवळ सर्व देशांनी आपले उद्योग, कारखाने पुण्यात प्रस्थापित केले. एकंदर शौर्य,साहस,बुद्धिमत्ता,नव निर्माण क्षमता,तंत्रज्ञान प्राप्ती,भांडवल उभारणी क्षमता देणारी ही सर्वच जनुके पुण्यात दिसून येतात. एकंदरच सर्व ग्रह पुण्याच्या कुंडलीत भाग्यस्थानी असल्यामुळे पुण्याची पत्रिका ही फारच चांगली आहे. या अशा चांगल्या पत्रिकेवरून आपण पुण्याचे भविष्य नक्कीच पाहू शकतो.

२०२० च्या जीवन सुलभता निर्देशांक, म्हणजेच ईझ ऑफ लिव्हिंग बिझनेस इंडेक्स नुसार पुणे उत्तम राहणीमानाकरता दुसऱ्या क्रमांकावरील शहर आहे. जवळजवळ ६० टक्क्याहून जास्त पुण्याची लोकसंख्या ही तीसच्या आतील वयाची आहे व यातील २५-३४ या वयोगटातील लोकांची संख्या जास्त आहे.हे पुण्याचे ग्रहसुद्धा आकर्षक आहेत. पुण्याचे सकल उत्पादन हे सुमारे सहालाख कोटी आहे. या सकल उत्पादनाच्या बाबतीत पुणे शहराचा देशात सातवा क्रमांक लागतो.पाचव्या व सहाव्या क्रमांकावर हैदराबाद व चेन्नई शहरे आहेत, ज्यांचे सकल उत्पादन पुण्याहून थोडेच जास्त आहे. ‘ईवाय’ म्हणजेच पूर्वीची ‘अर्न्स्ट ॲंड यंग’ यांच्या एका अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्था २०२७ च्या सुमारास ५ ट्रिलियन डॉलर म्हणजेच ४२५ लाख कोटीची होईल. २०३४ साली हीच अर्थव्यवस्था ८५० लाख कोटी रुपयांपर्यंत, तर २०४३ साली, १७०० लाख कोटी रुपयांची होईल.२०४८ साली तर , भारतीय अर्थव्यवस्था सुमारे २५५० लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचेल. पुण्याचा राष्ट्रीय सकल उत्पादनातील सहभाग हा सुमारे २ % आहे. म्हणजेच पुण्याचे पुढील काळातील सकल उत्पादन हे सुमारे ८.५ ,१७,३४,५१ लाख कोटी रुपये अनुक्रमे २०२७,२०३४,२०४३,२०४८ साली असेल असा आपण अंदाज बांधू शकतो. अर्थातच हे एक साधे अंकगणित आहे आणि हे अंकगणित थोड्याफार फरकाने बरोबर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आशावादी अंदाज पुण्याचे सकल उत्पादन याही पुढे जाईल असेही म्हणू शकेल. आजच्या घडीला पुण्यात वाहन उत्पादन उद्योग व त्या करता लागणारे सुटे भाग उत्पादन ,यंत्र सामुग्री उत्पादन, आयटी व आयटीशी निगडित उद्योग जसे वित्तीय सेवा,व्यापार सेवा, बाह्यस्त्रोत सेवा,कृषी यंत्र सामुग्री उत्पादन, खाद्य उत्पादन अशी अनेक क्षेत्रे प्रस्थापित झाली आहेत. देशातील एकंदर वाहन उद्योग उत्पादनात पुणे क्षेत्राचा हिस्सा सुमारे ३३ % आहे. पुण्याच्या अलीकडच्या काळात या सर्वच औद्योगिक क्षेत्रांनी नेत्रदीपक प्रगती केलेली दिसून येते. नवीन तंत्रज्ञान पुण्यात लवकर पोहोचते आणि रुजते सुद्धा. या मुळेच विद्युत वाहनांच्या उत्पादनात सुद्धा पुण्याचा सक्रिय सहभाग दिसून येतो. आजच्या काळात आपण कृत्रिम बुद्धिमत्ता,मशीन लर्निंग या उभरत्या क्षेत्रांकडे व त्याचा इतर उद्योगात वापर करण्याकडे जात आहोत. यावर पुण्यातील उद्योग संशोधन करून पुढची पायरी गाठत आहेत. ज्या रोबोटिक्स बद्दल आपण बोलतो व ज्याचा विस्तृत वापर सध्या उद्योगात होत आहे त्याची निर्मिती एका पुण्याच्याच कंपनीने १९९० साली म्हणजेच तीस दशके आधी केली.यावरून पुण्याच्या उद्योग आणि उद्योजकांची क्षमता दिसून येते.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणे व्हावे ‘ई-सिटी’!

डिपार्टमेंट फॉर प्रोमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड या भारत सरकारच्या विभागाच्या एका आकडेवारीनुसार २०१९- ते २०२२ या काळात महाराष्ट्रात भारताच्या एकंदर परकीय गुंतवणुकीच्या जवळजवळ २८ % परकीय गुंतवणूक आली.यातील बहुतांश गुंतवणूक पुणे क्षेत्रात झालेली दिसून येते. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात पुण्याचा देशात दुसरा क्रम लागतो.पुण्यातील औद्योगिक वातावरण,उपलब्ध कुशल मनुष्यबळ व त्याची वरच्या श्रेणीची उत्पादकता व सहकार्य करण्यास उपलब्ध असलेला सक्षम उद्योग यामुळे परकीय गुंतवणूकदार येणाऱ्या काळात सुद्धा पुण्यालाच गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रक्रम देतील. पुण्यात नवीन गुंतवणूक व तंत्रज्ञान हे येतच राहील.

पुणे हे जसे वाहन उद्योगाचे,आयटी,लघु,मध्यम उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे, तसेच मेट्रोलॉजि म्हणजे मोजणी यंत्रांचे सुद्धा मुख्य केंद्र आहे, तसेच पर्यायी इंधन या क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचे सुद्धा केंद्र आहे. या नवीन क्षेत्रातील उद्योग संशोधन व विकास या द्वारे जगातील अनेक मोठ्या बाजारपेठा काबीज करत आहेत. हेच आपल्याला जैविक तंत्रज्ञान व त्यातील उत्पादने या बाबतीत म्हणता येईल. पुण्यात आयटी,संगणक प्रणाली उद्योग तसेच वाहन ,यंत्रसामुग्री उद्योग हे सर्वच प्रगत अशा स्वरूपात आहेत.सध्या जगात सर्वत्र प्रस्थापित झालेल्या उद्योग ४.० प्रणालीचा उपयोग होत आहे. उद्योग ४.० हा आयटी आणि यंत्र तंत्रज्ञान यांचा संगम म्हणता येईल. पुण्यातील या दोन्ही क्षेत्रांची सक्षमता पाहता हा संगम म्हणजेच उद्योग ४.० ही जवळजवळ पुण्यात प्रस्थापित झाली आहे आणि येणाऱ्या काळात तिचा पुढील प्रवास चालू राहील. या सक्षमतेमुळेच पुण्यातील उद्योग येणाऱ्या भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेत अग्रक्रमाने कार्यरत राहील.

सध्या स्टार्टअप प्रकारच्या उद्योगांवर बरीच चर्चा होत असते. स्टार्टअप उद्योगांना सरकारकडून प्रोत्साहन मिळत आहे. या स्टार्टअप उद्योगात आयटी व सेवा क्षेत्रातील उद्योग मोठ्या प्रमाणात दिसून येतात. पुण्यातील स्टार्टअप परिसंस्था ही देशातील तिसऱ्या क्रमांकावर आहे.पुण्यात चांगले मार्गदर्शक,तसेच इनक्यूबेटर असल्यामुळे पुण्यातील योग्य स्टार्टअपना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत व होत राहतील.येणाऱ्या भविष्यात स्टार्टअप सारख्या मध्यम,लघु उद्योगांना अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान राहील किंबहुना आर्थिक प्रगतीचा वेग अशा प्रकारचेच उद्योग प्राप्त करून देतील.पुण्यातील आत्तापर्यंतचे स्टार्टअप पाहता लक्षात येते की व्यापारी तसेच सामाजिक क्षेत्रातील असंख्य प्रश्नांची उत्तरे हे उद्योग शोधून काढत आहेत व त्यामुळे ते ग्राहपयोगी होत आहेत. हे स्टार्टअप्स अनेक विविध क्षेत्रात प्रस्थापित होत आहेत. या सर्वांचा उपयोग पुण्याची अर्थव्यवस्था वाढीला लावण्यास नक्कीच होईल.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : नाटक ‘आपलं’ होण्यासाठी…

पायाभूत सुविधांच्या बाबतीत सुद्धा मोठ्या सुधारणा दृष्टिक्षेपात येत आहेत. पुणे- मुंबई,पुणे- नाशिक सारखे जलद महामार्ग,रेल्वे मार्ग आणि अपेक्षित असलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ पुण्याच्या अर्थव्यवस्थेला अजूनच बळकटी देईल.

एकंदर पुण्याची जनुके खूपच विकसित झालेली आणि होत असलेली दिसत आहेत. पुण्याचे सर्वच ग्रह हे उच्चीचे दिसत असल्यामुळे पुण्याचे भविष्य हे प्रगतीचेच आहे. पुणे तिथे काय उणे, असे म्हणताना आज थोडे अडखळायला होते, पण येणाऱ्या भविष्यात आपण अगदी आनंदाने जोमाने विचारू शकू ,‘पुणे तिथे काय उणे?’.

डॉ. अनंत सरदेशमुख

उद्योग व्यवस्थापन ,स्टार्टअप मार्गदर्शक.

anant.sardeshmukh@gmail.com